जळगाव (संपादक सुनिल पाटील) : जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. आणि भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही दीपावलीनिमित्त काव्य रत्नावली चौकात आकर्षक सजावट करण्यात आली आहे. यावर्षी जळगावकरांना अभिमान वाटेल असा तब्बल ३१ फूट उंच आणि ८०० किलो वजनाचा भव्य ‘लामण दिवा’ येथे उभारण्यात आला असून, तो संपूर्ण शहरात आकर्षणाचा मुख्य केंद्रबिंदू ठरला आहे.
या भव्य लामण दिव्याची मूळ संकल्पना संस्थेचे सहकारी विजय जैन यांची होती. अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांच्या मोलाच्या पाठबळामुळे आणि संपूर्ण टीमच्या अथक परिश्रमातून ही कलाकृती साकारली आहे. दिव्याची उभारणी अनिल पाटील व त्यांच्या टीमने केली, तर आर्टिस्ट राजेश नाईक यांनी सजावटीसाठी अविरत मेहनत घेतली. तसेच, हा संपूर्ण परिसर आणि चौक उत्तम दिसावा यासाठी सिव्हिल विभागाचे पंकज बऱ्हाटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले.
दीपावलीच्या शुभदिनी अध्यक्ष अशोकभाऊ जैन, अनिलभाऊ जैन, अजितभाऊ जैन, अतुलभाऊ जैन यांच्यासह जैन कुटुंबातील सदस्य गिमी फरहाद, अथांग, अभेद्य, अभंग, आत्मन्, अन्मय जैन आणि नगरसेवक नितीन बरडे यांनी काव्य रत्नावली चौकात भेट देऊन या भव्य दिव्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी ही कलाकृती साकारणाऱ्या संपूर्ण टीमचे मनस्वी कौतुक करून अभिनंदन केले. या प्रसंगी संस्थेच्या विविध विभागांचे सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







