जळगाव (संपादक सुनिल पाटील) | दीपोत्सवाच्या निमित्ताने जळगाव शहराच्या सौंदर्यात भर घालणारी एक देखणी आणि विचारप्रवर्तक कलाकृती काव्यरत्नावली चौकात साकारण्यात आली आहे. भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या वतीने येथे तब्बल ३२ फूट उंचीचा भव्य ‘लामण दिवा’ उभारण्यात आला असून, तो जळगावकरांचे मुख्य आकर्षण ठरत आहे. केवळ एक सजावट म्हणून न पाहता, मानवी आयुष्यातील विविध पैलूंना प्रकाशमान करण्याचा सकारात्मक संदेश या कलाकृतीतून देण्यात आला आहे.
“प्रकाशाचा उत्सव साजरा करत असताना इतरांच्या आयुष्यातही आनंदाचा प्रकाश निर्माण करण्याची भावना प्रत्येकामध्ये जागृत व्हावी, हाच या लामण दिव्याचा खरा हेतू आहे. ज्याप्रमाणे दिवा स्वतः जळून परिसर उजळवतो, त्याचप्रमाणे समाजाच्या प्रगतीसाठी संवेदनशीलता आणि समर्पणाची गरज असते. जळगावकरांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि सर्वांगीण वैभव नांदो, याच मंगल भावनेतून हा दिवा उभारण्यात आला आहे.”
— अशोक जैन, अध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.
भारतीय परंपरेत दिव्याला ज्ञान, सकारात्मकता आणि मांगल्याचे प्रतीक मानले जाते. हीच परंपरा आधुनिक कलात्मकतेशी जोडत या भव्य लामण दिव्याला सात ज्योतींचे स्वरूप दिले आहे. यातील प्रत्येक ज्योत ६ फुटांहून अधिक उंच असून, ती मानवी जीवनातील आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, सांस्कृतिक, संरक्षण आणि धार्मिक या सात महत्त्वाच्या क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करते. समाजातील प्रत्येक घटकाची या सातही अंगांनी प्रगती व्हावी, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
नाजूक दोऱ्यांच्या साहाय्याने उभारलेला हा सुमारे ८०० किलो वजनाचा सोनेरी दिवा पाहताना, तो थेट आकाशातून पृथ्वीवर अवतरल्याचा भास होतो. या रचनेतून ‘स्वप्ने आकाशाएवढी मोठी असावीत, पण आपली पाळेमुळे मातीशी आणि संस्कारांशी घट्ट जोडलेली असावीत,’ असा मोलाचा संदेश दिला गेला आहे. दिव्याचा सोनेरी रंग हा वैभव आणि संपन्नतेची प्रचिती देतो.
जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे अध्यक्ष अशोक जैन यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली हा दिवा तयार करण्यात आला आहे. गेल्या महिनाभरापासून कंपनीच्या कला विभागातील विजय जैन, डेव्हलपमेंट विभागातील अनिल पाटील, चंद्रशेखर विरपणकर आणि त्यांच्या २० सहकाऱ्यांनी ही कलाकृती साकारण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. दिव्याच्या आकर्षक सजावटीत राजेश नाईक यांचे विशेष सहकार्य लाभले.







