पुणे (मुख्य संपादक सुनिल पाटील) | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी (माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र) आणि बारावीच्या (उच्च माध्यमिक प्रमाणपत्र) परीक्षांचे अंतिम वेळापत्रक अखेर अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे. राज्य मंडळाच्या या घोषणेमुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या तयारीला आता अधिक वेग येणार असून, अभ्यासाचे नियोजन करणे सुलभ होणार आहे.
राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत या परीक्षा पार पडणार आहेत.
मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, बारावीची (इ. १२ वी) प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा बुधवार, २० जानेवारी २०२७ ते शनिवार, ६ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत घेतली जाईल. तर बारावीची मुख्य लेखी परीक्षा सोमवार, ८ फेब्रुवारी २०२७ ते गुरुवार, १८ मार्च २०२७ दरम्यान पार पडणार आहे.
दुसरीकडे, दहावीची (इ. १० वी) प्रात्यक्षिक, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा गुरुवार, २८ जानेवारी २०२७ ते शनिवार, १३ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत होणार असून, दहावीची लेखी परीक्षा सोमवार, १५ फेब्रुवारी २०२७ पासून सुरू होऊन सोमवार, १५ मार्च २०२७ रोजी समाप्त होईल.
हे अंतिम वेळापत्रक बोर्डाच्या www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर ६ नोव्हेंबर २०२६ पासून उपलब्ध करून देण्यात आले आहे. मात्र, संकेतस्थळावरील वेळापत्रक हे केवळ माहितीसाठी असून शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांकडून मिळणारे छापील वेळापत्रकच अंतिम ग्राह्य धरले जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी छापील वेळापत्रकावरूनच तारखांची खात्री करून घ्यावी, असे आवाहन राज्य मंडळाचे सचिव डॉ. दिपक माळी यांनी केले आहे.







