पुणे (जिल्हा क्राइम रिपोर्टर सुहास गायकवाड) | “स्वातंत्र्योत्तर काळात ५६५ हून अधिक लहान-मोठ्या संस्थानांचे भारतीय संघराज्यात यशस्वी विलीनीकरण करून सरदार वल्लभभाई पटेल यांनी एकसंध हिंदुस्थान घडवण्याचे ऐतिहासिक कार्य केले. जुनागढ, हैदराबाद आणि काश्मीरसारख्या अत्यंत कठीण संस्थानांचे विलीनीकरण करून त्यांनी देशाचे संभाव्य विभाजन रोखले. अखंड हिंदुस्थानच्या उभारणीत दिलेल्या या अद्वितीय योगदानामुळेच ते अखंड भारताचे खरे शिल्पकार ठरले,” असे परखड मत ज्येष्ठ समाजसेवक, प्रवचनकार तथा अपंग सेवक डॉ. रवींद्र भोळे यांनी व्यक्त केले.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त गुजरात येथील केवडिया (स्टॅच्यू ऑफ युनिटी) येथे आयोजित संचलनासाठी अंदमान-निकोबार, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा आणि पुद्दुचेरी येथील पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या वतीने ‘अखंड भारत राष्ट्रीय एकता रॅली’ काढण्यात आली आहे. ही रॅली उरुळी कांचन येथे दाखल झाली असता, उरुळी कांचन पोलीस ठाणे व ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने रॅलीचे उत्साहात स्वागत करून अभिवादन करण्यात आले. त्याप्रसंगी डॉ. भोळे बोलत होते.
या राष्ट्रीय एकता रॅलीच्या माध्यमातून व्यसनमुक्ती, राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रभक्तीची भावना वृद्धिंगत करणे आणि सामाजिक सलोखा प्रस्थापित करण्याचा संदेश देण्यात आला. रॅली उरुळी कांचन येथे पोहोचताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार, डॉ. रवींद्र भोळे आणि पोलीस अधिकाऱ्यांनी रॅलीतील जवानांचे व अधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
या सोहळ्यास शिवाजीराव कांचन, बाळकृष्ण काकडे, संतोष कांचन, मयूर कांचन, सुवर्णा कांचन, महंत गोपाळदास कपाटे, निखिल कांचन, किरण भंडारी यांच्यासह दैनिक सकाळचे पत्रकार सुनील जगताप, पत्रकार सुनील तुपे, सुरेश वाडेकर, दैनिक केसरीचे पत्रकार अमोल भोसले, ‘महाराष्ट्राची भूमी’चे बाबुराव चौधरी, पत्रकार शंकर झरड उपस्थित होते. याशिवाय उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार, स्वामी विवेकानंद विद्या मंदिराचे शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







