पुणे (जिल्हा क्राइम रिपोर्टर रोहन सोनाळे) | महाळुंगे इंगळे (ता. खेड, जि. पुणे) हद्दीत जावळे वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका तरुणावर जीवे मारण्याच्या उद्देशाने चाकूहल्ला करून गंभीर जखमी करणाऱ्या आरोपीस उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या ४ तासांच्या आत जेरबंद केले आहे. पारंपरिक व तांत्रिक तपासाची चक्रे जलदगतीने फिरवत पोलिसांनी ही धडाकेबाज कामगिरी केली आहे.
फिर्यादी राहुल शामकुमार निषाद (वय २३, रा. महाळुंगे इंगळे, ता. खेड, जि. पुणे, मूळ रा. उत्तर प्रदेश) हे ३० सप्टेंबर २०२६ रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास महाळुंगे स्मशानभूमी जवळून जात होते. त्या वेळी आरोपी ओम चंद्रकांत बहादुरे आणि अनिल रामराव आघाडे यांनी पूर्वरागातून किंवा जिवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या गळ्यावर व हातावर चाकुने वार करून त्यांना गंभीर जखमी केले.
या प्रकरणी फिर्यादीच्या জबनाववरून उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०९, ११५(२), ३५१(२), ३५२, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याकडील तपास पथकाने तातडीने तपासाची सूत्रे हलवली. सपोनि कल्याण घाडगे व इतर अंमलदारांनी अथक परिश्रम घेत आरोपी गुन्हा करून पळून जात असताना त्यांचा पाठलाग केला. अवघ्या ४ तासांच्या आत आरोपींना ताब्यात घेऊन पोलिसांनी गुन्हा यशस्वीरित्या उघडकीस आणला आहे.
सदरची यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, डॉ. बसवराज तेली, पोलीस उप-आयुक्त श्वेता खेडकर व सहायक पोलीस आयुक्त प्रिया डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी, सहायक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे आणि पोलीस पथकातील अंमलदारांनी पार पाडली आहे.







