पुणे (जिल्हा क्राइम रिपोर्टर सुहास गायकवाड) | हवेली तालुक्यातील उरुळी कांचन येथील बाजार मैदान परिसरात सुरू असलेल्या कल्याण क्लोज मटका जुगारावर पोलिसांनी छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत ९२० रुपये रोख रकमेसह मटका जुगाराच्या स्लिप बुक आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, जुगार चालविणाऱ्या दोघांसह त्यांना हा अवैध व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी सांगणाऱ्या आणखी दोघांविरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. २) सायंकाळी उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे पथक परिसरात अवैध व्यवसायांवर कारवाई करण्यासाठी गस्त घालत होते. त्यावेळी बाजार मैदान परिसरातील संतोष गायकवाड यांच्या इमारतीच्या आडोशाला कल्याण क्लोज मटका जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी गणेश शांताराम कांचन (वय ४२, रा. बाजार मैदान, उरुळी कांचन) आणि संतोष रामचंद्र चव्हाण (वय ४५, रा. यशवंतनगर, यवत, ता. दौंड) हे दोघे नागरिकांकडून पैसे स्वीकारून मटका जुगार चालवत असल्याचे आढळून आले.
पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले. घटनास्थळावरून ९२० रुपये रोख रक्कम, मटका जुगाराच्या स्लिप बुकसह अन्य साहित्य जप्त करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी आरोपींकडे अधिक चौकशी केली असता हा जुगार राजेंद्र उर्फ राजू पवार (रा. जय मल्हार रोड, उरुळी कांचन) आणि विक्रांत उर्फ विकी कांचन (रा. दत्तवाडी, उरुळी कांचन) यांच्या सांगण्यावरून सुरू असल्याची माहिती समोर आली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी गणेश कांचन, संतोष चव्हाण, राजेंद्र पवार आणि विक्रांत कांचन अशा चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक फौजदार सुनील सस्ते करीत आहेत. दरम्यान, परिसरातील अवैध जुगार आणि इतर बेकायदेशीर व्यवसायांवर पोलिसांकडून कारवाई सुरू असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.







