फटाक्यांमुळे अग्नितांडव; पिंपरी-चिंचवडमध्ये २५ फ्लॅटसह ५० ठिकाणी आगीचा भडका

fire
file photo

पुणे (जिल्हा क्राइम रिपोर्टर सुहास गायकवाड) | राज्यभरात आनंदाचे आणि जल्लोषाचे वातावरण असतानाच अनेक ठिकाणी या सणाला अग्नितांडवच्या भीषण घटनांचे गालबोट लागले आहे. लक्ष्मीपूजनाच्या रात्री फटाके वाजवताना झालेल्या निष्काळजीपणामुळे पिंपरी-चिंचवड आणि पुण्यासह भिवंडी, नाशिक, बीड, रायगड, धुळे आणि गोंदिया जिल्ह्यात आगीच्या दुर्घटना घडल्या. पिंपरी-चिंचवडमध्ये चक्क २५ फ्लॅट्ससह ५० ठिकाणी आगी लागल्याने नागरिक भयभीत झाले होते. सुदैवाने अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे सर्व आगींवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात आले असून मोठी जीवितहानी टळली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात फटाके फोडताना वेगवेगळ्या भागांत भीषण दुर्घटना घडल्या. अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध भागांत तब्बल २५ फ्लॅट आणि घरांना फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे आग लागली. याशिवाय मोकळी मैदाने, वाळलेले गवत आणि कचऱ्याच्या ठिकाणी आग लागण्याच्या २५ घटना घडल्या. तसेच फ्लेक्स, सोसायट्यांचे कंपाउंड आणि मोबाईल टॉवरला आग लागण्याच्या ५ घटनांची नोंद झाली. एकाच रात्री ५० ठिकाणी आगीचे कॉल आल्याने अग्निशमन दलाच्या गाड्यांची धावपळ उडाली. जवानांनी कौशल्याने आगीवर तातडीने नियंत्रण मिळवल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
पुणे शहरातही २४ वेगवेगळ्या ठिकाणी आगी लागल्याची नोंद झाली आहे. दुसरीकडे गोंदिया जिल्ह्यातील सडक-अर्जुनी येथे फटाक्याची ठिणगी उडाल्याने एका चायनीज सेंटरला भीषण आग लागली, ज्यामध्ये दुकानातील साहित्य जळून खाक झाले, लक्ष्मीपूजनाच्या रात्री भिवंडी, बीड, रायगड, नाशिक आणि धुळे या जिल्ह्यांमध्येही आगीच्या अनेक दुर्घटना समोर आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here