कटनी मध्ये कुटुंबातील ६ जणांचा होरपळून अंत

६ जणांचा

कटनी (वृत्तसंस्था) | दिवाळीच्या रात्री संपूर्ण शहर आनंदाच्या भरात असताना एका दुकानाला आग लागली. रात्री बाराच्या सुमारास पुरन अग्रवाल आणि रितेश अग्रवाल यांच्या दुकानाला भीषण आग लागली. बघता बघता तीन मजली इमारतीनं पेट घेतला. या भीषण दुर्घटनेत ६ जणांचा जीव गेला. पुरन अग्रवाल (७७), त्यांची पत्नी चंद्रकला (७४), सून पूनम, नात आर्या (१४), अन्वी (६) आणि २ महिन्यांच्या बाळाचा जीव गेला.

इमारतीमध्ये रात्रभर अग्निकल्लोळ सुरू होता. अग्रवाल कुटुंबाचा मृत्यूशी संघर्ष सुरू होता. त्यांना वाचवण्याचे प्रयत्न केले जात होते. पण अग्निशमन दलाच्या बेजबाबदार कारभारामुळे सहा जण जीवाला मुकले. पहाटे साडे चारच्या सुमारास ७७ वर्षीय पुरन अग्रवाल यांना बाहेर काढण्यात आलं. पण तेव्हा त्यांचा श्वास थांबला होता. यानंतर साडे सहाच्या दरम्यान जेसीबीच्या मदतीनं भिंत तोंडून अन्य पाच जणांना बाहेर काढण्यात आलं. त्यात २ वर्षांच्या चिमुकल्याचाही समावेश होता. चिमुरड्या बाळाचा निष्प्राण देह त्याच्या आईच्या कुशीत सापडला. त्याला पाहून उपस्थितांच्या अंगावर काटा आणला. अनेकांचे डोळे पाणावले.
या अग्निकल्लोळानं अग्निशमन दलाची पोलखोल केली. रात्री १२ च्या सुमारास आग लागली. नगर परिषद बरहीच्या अग्निशमन दलाची वाहनं जवळपास १ वाजता दुर्घटनास्थळी पोहोचली. पण त्यांचे पाईप फाटलेले होते. त्यानंतर दीड तासांनंतर विजयराघव गढहून अग्निशमन दलाचं वाहन पोहोचलं. पण त्यांचेही पाईप खराब होते. त्यामुळे आग विझवण्याच्या कामात अडथळे आले. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे आणि इमारतीमधून कुटुंबाला बाहेर काढण्याचे प्रयत्न सकाळपर्यंत सुरू राहिले. जेसीबीच्या मदतीनं भिंत तोडून बचावकार्य करण्यात आलं.
इतकी मोठी दुर्घटना घडूनही पहाटे चारपर्यंत प्रशासनातील एकही वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचला नाही. लोकांनी तहसीलदार, एसडीएम आणि जिल्हाधिकाऱ्यांना फोन केले. पण कोणाशीही संपर्क होऊ शकला नाही. पहाटे चारनंतर बरही पोलीस दलातील एसआय विनोदकांत सिंह आणि दिनेश सिंह बघेल घटनास्थळी पोहोचले. त्यांनी बचाव कार्यात सहकार्य केलं. सकाळी ७ वाजता विजयराघवगढचे एसडीओपी विनरेंद्र धारवे घटनास्थळी पोहोचले. नगर परिषदेचे अध्यक्ष पीयूष अग्रवाल रात्रभर घटनास्थळी उपस्थित होते. त्यांनी मदत आणि बचाव कार्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here