शीतला माता मंदिराच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांवर काळाचा घाला; १२ भाविकांचा जागीच

शीतला माता मंदिराच्या

ग्वाल्हेर (वृत्तसंस्था) | इथे एका भरधाव ट्रकने शेकडो लोकांना चिरडलं आहे. नवरात्रीच्या निमित्ताने शीतला माता मंदिराच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांवर रात्री दीड वाजता काळाने घाला घातला. या भीषण अपघातात १२ भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ३९ पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवरात्रीच्या उत्सवामुळे काल शनिवारी रात्री उशीरापर्यंत शीतला माता मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी जमली होती. छिनोरच्या दिशेने येणाऱ्या रस्त्यावर उतार खूप तीव्र असून तिथे जड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी आहे. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास धान्याने भरलेला एक ट्रक तिथे आला होता. पोलिसांनी तो ट्रक थांबवण्याचा प्रयत्न केला असता, तो ट्रक पोलिसांचे बॅरिकेड्स तोडून पुढे निघून गेला.

उतार तीव्र असल्याने, वेगानं थेट मंदिर परिसरातील दुकाने आणि तिथे उपस्थित भाविकांना चिरडत मंदिराच्या बाहेरील भिंत आणि गेटवर जाऊन आदळला. या दुर्घटनेनंतर घटनास्थळी एकच आरडाओरड, गोंधळ आणि आक्रोश उडाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासनानं तातडीनं मदतकार्य सुरू केलं. पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्यानंतर जखमींना तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आलं. उपचारादरम्यान १२ जणांचा मृत्यू झाल्याची सांगण्यात आलं आहे.

ग्वालियरचे एसएसपी धर्मवीर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात ३९ जण जखमी झाले असून त्यापैकी ५ ते ६ जणांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काहींना गंभीर फ्रॅक्चर झाले आहेत. उर्वरित जखमींना किरकोळ दुखापती झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे, या दुर्दैवी घटनेत सुरक्षेसाठी ड्युटीवर असलेले दोन पोलीस कर्मचारीही जखमी झाले असून त्यांच्यावर देखील उपचार सुरू आहेत. या प्रकरणाची पोलीस कसून चौकशी करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here