बेंगळुरु (कर्नाटक) (वृत्तसंस्था) | SIR विरोधात व मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आता देशभरातून आंदोलनांना सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. दिल्लीत आधी AISF यांच्याकडून तर आता विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात INDIA आघाडीचे आंदोलन सुरु आहे. अश्यातच कॉकरोच जनता पार्टीकडूनही आधी मुंबईतील शिवाजी पार्क आणि आज बेंगळुरूमधील फ्रिडम पार्कवर मोठे आंदोलन करण्यात आले.
बंगळुरूच्या फ्रिडम पार्कवर आज (गुरुवार, ८ ऑकटोबर) मोठे आंदोलन पार पडले. मतदार याद्यांची SIR प्रक्रिया रद्द करावी, तसेच देशभरात पुन्हा बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्यात या मागण्यांसाठी निदर्शन मोर्चा आन ‘जनन्यायालय’ आयोजित करण्यात आले होते.
या आंदोलनाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली. लोकप्रिय यूट्यूबर आणि डिजिटल कंटेंट क्रिएटर ध्रुव राठी यांनी भारतातील अशा सार्वजनिक आंदोलनात पहिल्यांदाच सहभाग घेतला. अभिनेते आणि कार्यकर्ते प्रकाश राज, राजकीय विश्लेषक पारकला प्रभाकर, ज्येष्ठ लेखक देवनूर महादेव आणि CJP संस्थापक अभिजीत दिपके यांच्यासह अनेक जण आंदोलनात सहभागी झाले. त्यांच्या उपस्थितीमुळे तरुण आणि Gen Z कार्यकर्त्यांचीही मोठी गर्दी झाली.
मोठ्या संख्येने आंदोलक जमण्याची शक्यता लक्षात घेता बेंगळुरू पोलिसांनी फ्रीडम पार्क परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली होती. कायदा आणि सुव्यवस्था तसेच शेषाद्री रोडवरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सुमारे 900 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते.
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीपासून SIR प्रक्रियेपर्यंत विविध मुद्द्यांवर देशभरात आंदोलनं सुरू असताना बेंगळुरूतील या आंदोलनामुळे कर्नाटकातील राजकीय वातावरणही चांगलंच तापलं आहे.







