नवोदय विद्यालयातील विद्यार्थिंनीच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करा; जळगावात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

नवोदय विद्यालयातील

जळगाव (जिल्हा क्राइम रिपोर्टर विनोद पाटील) | नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथील जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता आठवीत शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनी कु. निहारिका अनिल कोळी हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची सखोल, निष्पक्ष व उच्चस्तरीय अथवा सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणी दोषी आढळणाऱ्या व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि पीडित कुटुंबाला ५० लाख रुपयांची आर्थिक नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी आदर्श अनुसूचित जाती-जमाती बहुउद्देशीय सेवा संस्था आणि स्वराज्य जात पंचायत / पाडाखोत समुपदेशन केंद्र, जळगावच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

 

अक्कलकुवा येथील जवाहर नवोदय विद्यालयात निहारिका ही निवासी विद्यार्थिनी म्हणून शिकत होती. २३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी तिच्या प्रकृतीबाबत कुटुंबीयांना माहिती देण्यात आली आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR क्र. 0411/2026) दाखल करण्यात आला असून, हा मृत्यू नेमका कसा झाला याबाबत पालकांच्या आणि समाजबांधवांच्या मनात गंभीर शंका उपस्थित झाल्या आहेत.

निवेदनात या प्रकरणाची कोणतीही दबावाला बळी न पडता निष्पक्ष चौकशी व्हावी आणि आवश्यक असल्यास तपास सीबीआयकडे सोपवावा., विद्यालयातील सीसीटीव्ही फुटेज, डीव्हीआर, वसतिगृह आणि प्रवेशद्वारावरील रजिस्टर, वैद्यकीय नोंदी तसेच पोस्टमॉर्टेम व व्हिसेरा अहवाल तात्काळ सुरक्षित करून तपासात घेण्यात यावेत., वेळेवर उपचार मिळाले असता निहारिकाचा जीव वाचू शकला असता का, याबाबत वैद्यकीय तज्ज्ञांकडून स्वतंत्र अभिप्राय घेण्यात यावा., पीडित कुटुंबावर झालेल्या आघाताची भरपाई होऊ शकत नसली, तरी शासनाकडून ५० लाख रुपयांची आर्थिक मदत तात्काळ मंजूर करावी., निवासी शाळा आणि वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी २४ तास आपत्कालीन वैद्यकीय व्यवस्था व पुरेशी खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात यावेत.

अॅडव्होकेट प्रियंका गोकुळ कोळी यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करण्यात आले असून, या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here