रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय; रात्री ११ ते पहाटे ५ दरम्यान चार्जिंग पॉईंट्स राहणार बंद

चार्जिंग पॉईंट्स

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) | ट्रेनमधील आगीच्या दुर्घटना रोखण्यासाठी आणि प्रवाशांची सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी भारतीय रेल्वेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. यापुढे रेल्वेच्या सर्व डब्यांमधील मोबाईल व लॅपटॉप चार्जिंग पॉईंट्स रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश रेल्वे बोर्डाने जारी केले आहेत. या नियमाची सर्व विभागीय रेल्वे प्रशासनांनी १०० टक्के काटेकोर अंमलबजावणी करावी, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.

 

दक्षिण पूर्व रेल्वेच्या एका डब्यात घडलेल्या गंभीर घटनेनंतर हा निर्णय तातडीने लागू करण्यात आला आहे. रात्रीच्या वेळी चार्जिंग पॉईंट सुरू असताना एका प्रवाशाच्या पॉवर बँकचा अचानक स्फोट झाला आणि डब्यात मोठ्या प्रमाणावर धूर पसरला होता. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असली, तरी रात्रीच्या वेळी चार्जिंग पॉईंट्स बंद करण्याच्या नियमांचे पालन होत नसल्याचे यावरून उघड झाले.

या पार्श्वभूमीवर रेल्वे बोर्डाच्या विद्युत अभियांत्रिकी विभागाचे विशेष कार्य अधिकारी शोभित गुप्ता यांनी सर्व विभागीय रेल्वेच्या प्रधान मुख्य यांत्रिक अभियंत्यांना पत्र पाठवून नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.

या निर्णयाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संबंधित रेल्वे कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देऊन सतर्क करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गाड्यांमध्ये रात्रीच्या वेळी नियमांचे पालन होते की नाही, हे पाहण्यासाठी पर्यवेक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत नियमितपणे अचानक तपासणी (सरप्राईज इन्स्पेक्शन) केली जाणार आहे. कर्तव्यात कसूर करणाऱ्या किंवा हलगर्जीपणा दाखवणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांवर कठोर विभागीय कारवाई करण्याचा इशाराही रेल्वे बोर्डाने दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here