नवी दिल्ली (वृत्तसंस्था) | भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि भारताचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. छातीचा संसर्ग आणि वयोमानानुसार उद्भवणाऱ्या आरोग्य समस्यांवर उपचारासाठी अडवाणी यांना अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर तिथे उपचार सुरू आहेत. रुग्णालयाकडून त्यांच्या प्रकृतीविषयी अधिक माहिती दिली जाणार आहे.
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते एल. के. अडवाणी ९८ वर्षांचे आहेत. अडवाणी सध्या दिल्लीतील ३०, पृथ्वीराज रोड येथील त्यांच्या निवासस्थानी राहतात. डिसेंबर २०२४ मध्ये, अडवाणी यांना अपोलो रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी दाखल करण्यात आले होते. अलीकडेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.
लालकृष्ण अडवाणी यांनी १९८० मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्यासोबत भाजपची स्थापना केली. ते भाजपचे सर्वाधिक काळ अध्यक्ष होते. त्यांच्या नेतृत्वाखाली, पक्षाने १९८४ मधील केवळ दोन जागांवरून १९९८ मध्ये १८२ जागांपर्यंत मजल मारली. अडवाणी १९८९ पासून लोकसभेचे सदस्य होते आणि २०१९ मध्ये निवृत्त होईपर्यंत त्यांनी सात वेळा खासदारकी भूषवली, ज्यात बहुतेक काळ त्यांनी गांधीनगर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. १९९८-२००४ पर्यंत देशाचे गृहमंत्री आणि २००२-२००४ पर्यंत उपपंतप्रधान म्हणून काम केले. अडवाणी यांना २०२४ मध्ये भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान, भारतरत्न, प्रदान करण्यात आला आहे.







