निवृत्त हवाई दल अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; लोखंडी रॉडने मारहाण

जीवघेणा हल्ला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) । पाकिस्तानविरुद्ध १९९९ मध्ये झालेल्या कारगिल युद्धात ‘ऑपरेशन सफेद सागर’ गाजवणारे हवाई दलाचे निवृत्त ग्रुप कॅप्टन अमित कुमार गुप्ता यांच्यावर पार्किंगच्या किरकोळ वादातून लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात गुप्ता गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला आणि हाताला जबर दुखापत झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री आठच्या सुमारास गुप्ता हे आपल्या कुटुंबाला एका रेस्टॉरंटजवळ सोडून मॅग्नम ग्लोबल पार्क येथे कार पार्क करण्यासाठी गेले होते. यावेळी तेथील पार्किंग कर्मचाऱ्यांनी त्यांना व्हॅलेट पार्किंग, तळघर आणि नंतर मल्टिलेव्हल पार्किंगमध्ये वारंवार फिरवले. अखेर त्यांनी गुप्ता यांना कार पार्क करण्यास थेट नकार दिला.
पार्किंग नाकारल्याने जेव्हा गुप्ता आपली गाडी मागे घेऊन बाहेर पडू लागले, तेव्हा एका पार्किंग कर्मचाऱ्याने थेट लोखंडी रॉड काढून त्यांच्या गाडीच्या काचेवर मारण्यास सुरुवात केली. गुप्ता यांनी गाडीबाहेर पडून या प्रकाराला विरोध केला असता, आरोपीने त्यांच्यावरच रॉडने सपासप वार केले. या हल्ल्यात गुप्ता यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला, तर हाताचा कोपरा फ्रॅक्चर झाला.
हल्ल्याच्या वेळी घटनास्थळी उपस्थित असलेले सुरक्षा रक्षक किंवा इतर कर्मचारी त्यांच्या मदतीला धावून आले नाहीत. एका रेस्टॉरंटच्या शेफने वेळीच मध्यस्थी केल्याने गुप्ता यांचा जीव वाचला. पोलीस नियंत्रण कक्षाला तातडीने फोन करूनही सुमारे अर्धा तास कोणतीही मदत मिळाली नाही, असा आरोपही गुप्ता यांनी केला आहे.
गंभीर अवस्थेत गुप्ता यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे फ्रॅक्चर झालेल्या हातावर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून प्लेट बसवण्यात आली आहे. दरम्यान, पोलीस आणि संबंधित रुग्णालयाने संगनमत करून वैद्यकीय अहवाल चुकीचा बनवला असून, त्यात डोक्याची दुखापत आणि फ्रॅक्चरचा उल्लेख टाळण्यात आल्याचा गंभीर आरोप गुप्ता यांनी केला आहे. या प्रकरणी गुप्ता यांनी पोलिसांत लेखी तक्रार दाखल केली असून आरोपीवर हत्येचा प्रयत्न आणि गंभीर दुखापत केल्याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे पुढील तपास सुरू केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here