चैन्नई (वृत्तसंस्था) । मुख्यमंत्री सी.जोसेफ विजय यांच्या नेतृत्वाखालील सरकारला त्यांच्याच मित्रपक्षांनी धक्का दिला आहे. राज्यात ६ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा पोटनिवडणूकाआधी CPI आणि CPM या डाव्या पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. पोटनिवडणुकीत डाव्या पक्षांची साथ सुटल्याने आता विधानसभेतही TVKच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी पोटनिवडणुकीत CPI धारापूरम मतदारसंघातून आपले उमेदवार मैदानात उतरवणार आहे. दोन्ही पक्षांनी स्पष्ट केले आहे की, ते TVK च्या नेतृत्वाखालील कोणत्याही निवडणूक आघाडीचा भाग नाहीत. तसेच CPM चे ज्येष्ठ नेते पी.षणमुगम यांच्या व्यक्तव्यामुळेही विजय यांच्या अडचणी वाढल्या आहेत. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत षणमुगम यांनी म्हटले आहे की, विजय यांच्या सरकारला पूर्ण पाच वर्ष पाठिंबा द्यायचा की नाही ते सरकारची धोरणे, निर्णय आणि लोकांप्रती असलेल्या त्यांच्या भूमिकेवर अवलंबून असेल.
याआधी मुख्यमंत्री विजय यांनी आघाडी मजबूत करण्याच्या उद्देशाने 9 सप्टेंबर रोजी एक महत्वाची बैठक बोलावली होती. मात्र डाव्या पक्षांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला. CPM चे षणमुगम यांनी सांगितले की, TVK ला नवी निवडणूक आघाडी तयार करायची असल्याने त्यांच्या पक्षाने या बैठकीला उपस्थित राहणे टाळले. तर CPI ने स्पष्ट केले की, पक्ष बाहेरून विजय सरकारला पाठिंबा देत असला तरी सध्या कोणत्याही निवडणूक आघाडीत सहभागी होणार नाही.







