बिलासपूर (छत्तीसगड) (वृत्तसंस्था) । जिल्ह्यात तखतपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामपंचायत समडीलमध्ये घोंगा नदी ओलांडताना तीन मुलांचा शनिवारी सायंकाळी मृत्यू झाला. मुलं शाळेतून घरी परत येत असताना ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलीस अधिकारी अवनीश पासवान यांच्या माहितीनुसार, “शाळेतून घरी परतत असताना घोंगा नदीच्या प्रवाहाचा वेग प्रचंड असल्यानं ही तीन मुलं वाहून गेली. त्यानंतर या बेपत्ता मुलांचा शोध घेण्यासाठी एसडीआरएफचे पथक तैनात करण्यात आलं. अखेर नदीतून या तिन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.अनमोल जैस्वाल (वय ७), स्तुती जैस्वाल (वय ९) आणि शिक्षा जैस्वाल (वय ८) अशी या मृत मुलांची ओळख पटली आहे.
कुटुंबीयांच्या माहितीनुसार, ही मुलं सहसा शाळेत जाण्यासाठी दुसऱ्या मार्गाचा वापर करत होती. मात्र, दुर्घटनेच्या दिवशी त्यांना उशीर झाल्यामुळं त्यांनी नदीकडचा मार्ग निवडला. शाळेनंतर घरी परतताना याच मार्गावरून येत असताना ही दुर्दैवी घटना घडली.
गावकऱ्यांनी सांगितलं की, सकाळी जेव्हा मुलं शाळेला निघाली होती, तेव्हा नदीतील पाण्याची पातळी बरीच कमी होती. मात्र ती घरी परतत असताना पाण्याची पातळी बऱ्याच प्रमाणात वाढली होती. पाण्याची पातळी वाढल्याची कल्पना नसल्यामुळं मुलांनी नदी ओलांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याचा जोरदार प्रवाहमुळं ही मुलं पाण्यात वाहून गेली.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मुलांचा शोध घेण्यास सुरुवात केली. तसंच याबाबत पोलिसांना माहिती दिली सततच्या पावसामुळं परिसरातील बहुतांश नद्या आणि ओढे दुथडी भरून वाहत असल्याचं स्थानिकांनी सांगितलं. दरम्यान, नद्या किंवा ओढे ओलांडण्याचा प्रयत्न करून आपला जीव धोक्यात न घालण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं नागरिकांना केलं होतं.







