गिनी (वृत्तसंस्था) । राजधानी कोनाक्रीमध्ये दार एस सलाम इथं झोपड्यांवर कचऱ्याचा डोंगर कोसळल्यानं दुर्घटना घडली आहे. यामध्ये २२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या दुर्घटनेत अनेकजण जखमी झाल्याची माहिती देखील मिळत आहे. बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे.
गिनीच्या नागरी संरक्षण सेवेच्या प्राथमिक आकडेवारीनुसार या दुर्घटनेत आतापर्यंत किमान २२ जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास कोनाक्रीमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे हे भूस्खलन झाले आहे. ज्यामुळे कचराभूमी ओसंडून वाहू लागली आणि कचराभूमीच्या आजूबाजूच्या झोपड्या गाडल्या गेल्या. घटनास्थळी बचाव कार्य सुरु करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कचराभूमीजवळ राहणाऱ्या स्थानिक रहिवाशांना परिसर रिकामा करण्याच्या नोटिसा आधीच बजावण्यात आल्या होत्या. त्यानंतर अनेकांनी आपली घरे सोडून इतरत्र पलायन केले होते. मात्र, काही लोक अद्यापही तिथे राहत होते.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत अनेकजण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती देखील मिळत आहे. जखमींवर उपचार सुरु करण्यात आले आहे. पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास मुसळधार पाऊस सुरू झाला आणि पावसाचे पाणी कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर गेल्याने भूस्खलन झाले. या भूस्खलनामुळे जवळच्या झोपड्या ढिगारा आणि चिखलाखाली गाडल्या गेल्या.







