जपानमध्ये तासाभरात दोन वेळा भूकंप; ३० जण जखमी

जपान

टोकियो (वृत्तसंस्था) । जपानच्या होक्काइडो प्रांतात रविवारी रात्री पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला. जपानमध्ये तासाभरातच दुसऱ्यांदा भूकंप झाला आहे. जपानच्या हवामानशास्त्र एजन्सीनं दिलेल्या माहितीनुसार होक्काइडोमध्ये झालेल्या दुसऱ्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.० नोंदवण्यात आली. स्थानिक प्रमाण वेळेनुसार दुसरा भूकंप १०.४५ वाजता झाला.

दुसऱ्या भूकंपाचं केंद्र होक्काइडोमधील उराकावा किनाऱ्यापासून समु्द्राच्या तळ्याशी ४० किलोमीटर अंतरावर नोंदवण्यात आलं. दुसऱ्या भूकंपानंतर सुनामीचा कोणताही अलर्ट जारी करण्यात आलेला नाही. याच कारण भूकंपाची तीव्रता ७ च्या स्केलवर ४ नोंदवण्यात आली आहे.
जपानच्या होक्काइडोमध्ये झालेल्या भूकंपापूर्वी पूर्व भागात तासाभरापूर्वी ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला होता. यामुळं राजधानी टोक्योमध्ये काही काळासाठी अफरातफरी सारखी स्थिती निर्माण झाली होती. भूकंपाच्या धक्क्यांमुळं टोक्योमध्ये ३० हून अधिक लोक जखमी झाले होते.
असोसिएटेड प्रेसच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं दिलेल्या रिपोर्टनुसार टोकियोमध्ये जेव्हा भूकंपाचा पहिला धक्का बसला तेव्हा जे लोक झोपलेले होते ते जखमी झाले. भूकंपाच्या धक्क्यांना घाबरुन बेडवरुन उठण्याच्या प्रयत्नात ते खाली पडले किंवा इतर गोष्टींना धडकल्यानं जखमी झाले.
जपानमधील पहिल्या भूकंपाच्या धक्क्यानं राजधानी टोकियोसह इतर भागांमध्ये ट्रेन सेवा विस्कळीत झाली होती. टोकियो आणि नरिता एअरपोर्टला जोडणाऱ्या एक्स्प्रेस ट्रेन आणि उत्तर पूर्व भागातील लोकल उशिरानं धावत होत्या. शिंकानसेन बुलेट ट्रेन प्रकल्प कोणत्याही विलंबाशिवाय सुरु होता. जपानच्या पंतप्रधानांनी सरकारनं भूकंपामुळं झालेल्या नुकसानाचा अभ्यास करण्यासाठी एक टास्क फोर्स स्थापन केल्याचं सांगितलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here