Video : एव्हरेस्ट मोहिमेदरम्यान हेलिकॉप्टर अपघातात भारतीय नागरिक दगावला

हेलिकॉप्टर

काठमांडू (वृत्तसंस्था) | नेपाळमधील प्रसिद्ध एव्हरेस्ट परिसरात लॅण्डिंगच्या प्रयत्नात असताना दोन हेलिकॉप्टरची एकमेकांना आमने-सामने धडक बसली, ज्यामुळे क्षणात होत्याचे नव्हते झाले. या भीषण दुर्घटनेत एका भारतीय पर्यटकाचा जागीच मृत्यू झाला असून, भारतीय वंशाचे न्यूझीलंडचे नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. तसेच दोन्ही हेलिकॉप्टरचे पायलटही या अपघातात जखमी झाले आहेत.

 

मंगळवारी सकाळी ८ वाजून ११ मिनिटांच्या सुमारास सोलुखुम्बू जिल्ह्यातील फेरी येथील हेलीपॅडवर हा अपघात घडला. फिशटेल एअर आणि एअर डायनेस्टी  या दोन वेगवेगळ्या कंपन्यांची हेलिकॉप्टर लॅण्डिंग करण्याचा प्रयत्न करत असताना आपापसात धडकली. हा अपघात नेमका कोणत्या तांत्रिक किंवा मानवीय कारणामुळे झाला, याबाबतची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.

सोलुखुम्बू जिल्हा पोलीस कार्यालयाचे पोलीस निरीक्षक मौसम तामांग यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिशटेल एअरच्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करणारे भारतीय पर्यटक वसंत कुमार बालारामारामाडू यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. त्याच हेलिकॉप्टरमध्ये उपस्थित असलेले भारतीय वंशाचे न्यूझीलंडचे नागरिक शैलेश कृष्ण पटेल हे गंभीर जखमी झाले आहेत.

घटनास्थळावरून जखमी शैलेश पटेल यांना प्रभू हेलिकॉप्टरच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी तत्काळ काठमांडू येथील मेडिसिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याशिवाय, दोन्ही हेलिकॉप्टरच्या जखमी पायलटनाही उपचारासाठी काठमांडू येथे हलवण्यात आले आहे. मृत भारतीय पर्यटकाचा मृतदेह लुकला येथील रुग्णालयात आणण्यात आला आहे. अपघाताच्या वेळी दोन्ही हेलिकॉप्टरमध्ये एकूण किती प्रवासी सवार होते, याबाबतची सविस्तर माहिती मिळवण्याचे काम सुरू असून पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here