बंगालच्या उपसागरात पनामाचा ध्वज असलेले मालवाहू जहाज बुडालं; भारतीय नौदलाकडून बचावकार्य सुरू

मालवाहू जहाज
संग्रहित छायाचित्र

पारादीप (वृत्तसंस्था) । ओडिशामधील पारादीप किनाऱ्यापासून सुमारे २४० सागरी मैल अंतरावर बंगालच्या उपसागरात पनामाचा ध्वज असलेले मालवाहू जहाज शनिवारी बुडाले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

हे जहाज ओडिशाहून लोहखनिज घेऊन सिंगापूरच्या दिशेने जात होते. त्यावर २४ कर्मचारी होते, असे त्यांनी सांगितले. भारतीय तटरक्षक दल आणि भारतीय नौदलाने बचाव मोहीम सुरू केली आहे, असेही त्यांनी नमूद केले.
“चालक दलातील किती सदस्यांची सुटका करण्यात आली आहे, याबाबत आम्हाला निश्चित माहिती नाही,” असे एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले. त्यांनी पुढे नमूद केले की, चालक दलातील बहुतांश सदस्य चिनी होते. बचाव कार्यात मदत करण्यासाठी परिसरातील इतर जहाजांनाही सतर्क करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले. “हे जहाज शुक्रवारी ओडिशाच्या किनाऱ्यावरून निघाले होते,” असे त्या अधिकाऱ्याने सांगितले.
“जहाज शोधण्यासाठी, कर्मचाऱ्यांची सुटका करण्याठी प्रयत्न करत आहोत. आम्ही आसपासच्या जहाजांना देखील अलर्ट जारी केला आहे. सध्या जहाजाचा शोध सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजूनही जहाज नक्की का बुडाले याबाबत माहिती मिळू शकली नाही. जहाजावर २० चिनी नागरिक होते. दोघे म्यानमारचे आणि एक जण बांगलादेशचा नागरिक असल्याची माहिती आहे,” अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
मिळालेली माहिती अशी की, पनामाचा ध्वज असलेले जहाज १ हजार ७०० टन लोहखनिजाचा साठा घेऊन २० ऑगस्ट रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास पारादीपहून निघाले होते. काही नॉटिकल मैल पार केल्यानंतर या जहाजाचा संपर्क तुटला. मात्र, नक्की काय झाले, याबाबत माहिती अजून मिळू शकली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here