जळगाव (संपादक सुनिल पाटील) | मू. जे. स्वायत्त महाविद्यालयांतर्गत असलेल्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान मंडळातर्फे आज विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात शेकडो विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षक प्रा. शिल्पा सरोदे या होत्या. कार्यक्रमाची सुरुवात करताना, जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने विद्यार्थ्यांना आरोग्य सेवा दिली. यामध्ये डॉ. लोकेश चौधरी आणि डॉ. शीतल ढेवले यांनी विद्यार्थ्यांची सखोल आरोग्य तपासणी केली. विद्यार्थ्यांना आजारानुसार आवश्यक औषधोपचार सूचविले व सविस्तर माहिती देवून पुढील उपचारांविषयी मार्गदर्शन केले. फार्मसिस्ट स्वाती इंगळे व दीप्ती वावीकर यांनी आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांना मोफत औषधे दिलीत.
‘पौगंडावस्थेतील आरोग्यावर मार्गदर्शन’
यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. लोकेश चौधरी यांनी पौगंडावस्थेतील विद्यार्थ्यांची मानसिक अवस्था, शारीरिक वाढ आणि विकास यावर सविस्तर माहिती दिली. तसेच योग्य आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि जंक फूड टाळण्याबाबत मोलाचे सल्ले दिले. शासकीय रुग्णालयामार्फत ० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांसाठी असणाऱ्या विविध आरोग्य योजना, नेत्ररोग, दंतरोग, हृदयरोग निदान आणि मोफत शस्त्रक्रियांची माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली.
या शिबिरात विद्यार्थ्यांची नेत्र, दंत, त्वचा रोग तपासणी करण्यात आली. तसेच पावसाळ्यात उद्भवणारे सर्दी, खोकला यांसारख्या विषाणूजन्य आजारांची व दिव्यांग विद्यार्थ्यांची विशेष तपासणी करण्यात आली.
सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. किरण महाजन यांनी केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी विज्ञान मंडळाच्या अध्यक्षा प्रा. डॉ. श्रद्धा पाटील, समन्वयक प्रा. उमेश पाटील, प्रा. गुणवंत वंजारी व सर्व सहकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.







