
आगामी २० वर्षांच्या विकास आराखड्यात हवामान अनुकूल तरतुदी करा; पक्षिमित्र राजेंद्र गाडगीळ यांची प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी
जळगाव (संपादक सुनिल पाटील) | वाढत्या नागरीकरणासोबतच जळगाव शहराला उन्हाळ्यातील ४५ अंश सेल्सिअसपुढील अतिउच्च तापमान, तीव्र उष्णतेच्या लाटा, अनियमित पाऊस, खालावलेली भूजल पातळी आणि मान्सूनमधील शहरी पूरस्थिती यांसारख्या हवामान बदलाच्या गंभीर संकटांचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर, हद्दवाढीसह तयार होणाऱ्या जळगाव शहराच्या आगामी २० वर्षांच्या विकास आराखड्यात (Development Plan) हवामान अनुकूल व पर्यावरणपूरक तांत्रिक तरतुदींचा तात्काळ समावेश करावा, अशी मागणी जळगावचे ज्येष्ठ पक्षिमित्र राजेंद्र गाडगीळ यांनी प्रशासनाकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
केंद्र शासनाची ‘राष्ट्रीय नागरी व्यवहार संस्था’ (NIUA), ‘सी४० सिटीज’ (C40 Cities) आणि ‘कम्युनिटी जमील’ यांच्या संयुक्त विद्यमाने २० नोव्हेंबर २०२६ रोजी चेन्नई येथे ‘क्लायमेट ॲक्शन गाईड फॉर अर्बन प्लॅनर्स इन इंडिया’ (Climate Action Guide for Urban Planners in India) ही विशेष मार्गदर्शिका प्रसिद्ध करण्यात आली आहे. चेन्नई महानगर विकास प्राधिकरणाने (CMDA) आपल्या तिसऱ्या बृहद आराखड्यात (२०२६–२०४६) या मार्गदर्शिकेचा अवलंब करत हवामान कृती आराखड्याची जोड थेट वैधानिक नियोजन आणि झोनिंग नियमांशी घातली आहे. याच धर्तीवर ‘महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६’ (MRTP Act) अन्वये जळगावचा विकास आराखडा तयार करताना राष्ट्रीय मार्गदर्शिकेनुसार नियोजन करावे, असे या निवेदनात नमूद केले आहे.
निवेदनातील ५ प्रमुख मागण्या करण्यात आल्या असून, त्यात उष्णता-धोका मॉडेलिंग (Heat-Risk Modeling): जळगावची भौगोलिक स्थिती पाहता शहरातील सर्वाधिक उष्णता निर्माण होणाऱ्या भागांचे (Urban Heat Islands) उपग्रह व शास्त्रीय सर्वेक्षण करावे. त्यानुसार तेथील बांधकाम घनता (FSI/TDR) नियंत्रित करून वाऱ्याचे नैसर्गिक प्रवाह (Wind Corridors) खुले राहतील असे नियोजन करावे. जलविज्ञान संवेदनशीलता मूल्यांकन (Hydrological Assessment): शहरातील मेहरूण तलाव, लेंडी नाला, गिरणा नदीपात्र तसेच इतर सर्व नैसर्गिक ओढे व नाल्यांच्या पूररेषांचे (निळी व लाल पूररेषा) अचूक सीमांकन करून ते विकास आराखड्यावर दर्शवावे. नैसर्गिक जलप्रवाहांच्या मार्गात होणारे अतिक्रमण, भराव किंवा काँक्रिटीकरण पूर्णपणे थांबवावे. निळ्या-हिरव्या पायाभूत सुविधांचे (Blue-Green Infrastructure) बंधन: केवळ सिमेंट-काँक्रिटचे रस्ते आणि इमारतींना प्राधान्य न देता, नैसर्गिक जलस्रोत आणि सलग वृक्षराजी, उद्याने व मोकळ्या जागा यांची एकत्रित साखळी ‘एकात्मिक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली’ (UDCPR) अंतर्गत बंधनकारक करावी. झोनिंग नियमांमध्ये ग्रीन कव्हर व जलसंधारण: कोणत्याही परिस्थितीत हरित क्षेत्र (Green Zone), ना-विकास क्षेत्र (No Development Zone) आणि पाणलोट क्षेत्रांचे रूपांतर निवासी किंवा व्यावसायिक झोनमध्ये करू नये. तसेच, सर्व नवीन शासकीय व खाजगी बांधकाम प्रकल्पांसाठी पर्जन्यजल संकलन (Rainwater Harvesting), भूजल पुनर्भरण आणि पारगम्य पृष्ठभागांचे (Perforated Paver blocks) निकष कडक करावेत. स्वतंत्र ‘हवामान कृती कक्ष’ व नागरी सहभाग: विकास आराखड्याच्या हवामानपूरक अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी महापालिकेत स्वतंत्र ‘हवामान व पर्यावरण कृती कक्ष’ स्थापन करावा. या प्रक्रियेत स्थानिक पर्यावरण तज्ज्ञ, पक्षिमित्र व नागरिकांच्या सूचनांचा नियमित समावेश करावा.
जळगाव शहराला भविष्यातील तीव्र हवामान संकटांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी राष्ट्रीय नागरी व्यवहार संस्थेच्या (NIUA) मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रस्तावित विकास आराखड्यात तात्काळ बदल करावेत, अशी विनंती पक्षिमित्र राजेंद्र गाडगीळ यांनी प्रशासनाकडे केली आहे.







