
जळगाव (संपादक सुनिल पाटील) | “रक्तदान करा, जीवनदान द्या” हा सामाजिक संदेश देत जळगाव येथील नूतन मराठा महाविद्यालयात ७९ व्या राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) स्थापना दिनाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयातील छात्रसैनिकांसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि नागरिकांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून समाजाप्रती आपली सामाजिक बांधिलकी जपली. या शिबिरात एकूण ३० रक्तदात्यांनी रक्तदान केले.
शिबिराचे उद्घाटन शहरातील प्रसिद्ध वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. महेश काबरा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून सुभेदार मेजर सूर्यदेव, विजय वाणी, प्रा. आर. बी. देशमुख, उपप्राचार्य के. बी. पाटील, आणि संस्थेचे संचालक जगदीश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. उद्घाटनप्रसंगी डॉ. काबरा यांनी रक्तदानाचे वैद्यकीय व सामाजिक महत्त्व विशद करत तरुणांनी अशा समाजोपयोगी उपक्रमांत नेहमी पुढे राहावे, असे आवाहन केले.
या शिबिराचे विशेष आकर्षण म्हणजे वैयक्तिक आयुष्यातील आनंदाचे क्षण सामाजिक उपक्रमातून साजरे करण्याचा उपक्रम होय. डॉ. नूतन पाटील व नागेश पाटील या दाम्पत्याने आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान करून समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला. तसेच, जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह. समाजाचे संचालक जगदीश शिंदे यांनीही आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान केले. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख, कर्नल धीरज मिनोत्रा आणि कर्नल अश्विन वैद्य यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले. एनसीसीच्या छात्रसैनिकांसोबतच महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही रक्तदान करून विद्यार्थ्यांसमोर आदर्श निर्माण केला.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी एनसीसी अधिकारी लेफ्टनंट हेमाक्षी वानखेडे व लेफ्टनंट शिवराज पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमासाठी ‘शिवाज्ञा बहुउद्देशीय संस्थेचे’ विवेक महाजन व विकास पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले, तर रक्त संकलनाची तांत्रिक जबाबदारी ‘रेड प्लस ब्लड सेंटर’च्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.







