मदुराई (वृत्तसंस्था) । मीनाक्षी अम्मन मंदिर ट्रस्टच्या ६० कोटी रुपयांच्या जमिनीच्या अपहार प्रकरणी माजी उपनिबंधक अनंतरामन यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, मदुराई मीनाक्षी अम्मन मंदिर आणि अलगार कोइलच्या सेवांसाठी मंदिर ट्रस्टला देण्यात आलेल्या जवळपास ६० कोटी रुपयांच्या जमिनीच्या लीजला बेकायदेशीरपणे ट्रान्सफर केल्याचा आणि बनावट कागदपत्रांचा वापर करून दस्तऐवज नोंदवल्याच्या आरोपाखाली माजी उपनिबंधक अनंतरामन यांना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणात आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे. मदुराईच्या तल्लाकुलम भागातील मंदिर ट्रस्टच्या मालकीच्या जवळपास १.७ ते २ एकर जमिनीतील कथित अनियमिततेबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान, १९३० मध्ये मंदिराच्या सेवांसाठी स्थापन झालेल्या ट्रस्टला देण्यात आलेली ही मालमत्ता विक्रीयोग्य किंवा गहाण ठेवण्यायोग्य नव्हती. मात्र, महसूल नोंदींमध्ये मंदिराची मालकी बदलण्यात आली होती आणि काही लोकांच्या नावावर भाडेपट्टी आकारण्यात आली होती, असं तपासातून समोर आलं आहे.
मीनाक्षी अम्मन मंदिराचे सहआयुक्त चेल्लाथुराई यांच्या तक्रारीच्या आधारे, मदुराई महानगर पोलिसांच्या गुन्हे शाखेनं सरकारी अधिकारी, माजी अधिकारी, उपनिबंधक आणि जमीन मालकांसह १९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये माजी तहसीलदार अन्बझगन, माजी ग्राम प्रशासकीय अधिकारी अरासन, माजी मुरप्पानाडू उपनिबंधक अनंतरामन, प्रकाश, प्रशांत चंदनकरुप्पन आणि इतर अधिकारी तसंच राजकुमार, इलैयाराजा आणि अनिश सारख्या लोकांचा समावेश आहे.







