पुण्यात राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर दोन विद्यार्थी संघटनांमध्ये राडा

छात्रों की गूंज

पुणे (विशेष प्रतिनिधी) । लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा आज ‘छात्रों की गूंज’ हा कार्यक्रम पुण्यातील एसएसपीएमपीएस प्रशालेच्या मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. मात्र या कार्यक्रमापूर्वीच पुण्यात दोन विद्यार्थी संघटनांमध्ये राडा झाला. या कार्यक्रमापूर्वी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) कार्यकर्त्यांनी शुक्रवारी सायंकाळी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहासमोर घोषणाबाजी केली. तर, COEP कॉलेजमधील काही विद्यार्थीनींना मारहाण करण्यात आल्याचा दावा महाराष्ट्र काँग्रेसने केला आहे.

या आरोपांसंदर्भात महाराष्ट्र काँग्रेसने रात्री पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेवर विविध आरोप केले. “काल COEP कॉलेजमधील काही विद्यार्थीनींनी माध्यमांमध्ये बाईट दिला होता की, कॉलेजमधून आम्हाला तीन वर्षांपासून स्कॉलरशीप मिळालेली नाही. हा मुद्दा आम्ही राहुल गांधी यांच्यासमोर मांडणार आहोत. यानंतर ABVPच्या काही गुंडांनी या मुलींना धमकावलं, त्यांनी उद्याच्या कार्यक्रमाला जावू नये यासाठी त्यांना डांबून ठेवण्यात आलं, तसंच रात्री ८ वाजेपर्यंत त्यांनी कॉलेजची बदनामी थांबवत आम्ही सांगू त्या पद्धतीनं माध्यमांना बाईट द्यायचा, अन्यथा तुम्हाला हॉस्टेलमधून आणि कॉलेजमधून काढून टाकू अशी धमकी त्या विद्यार्थीनींना देण्यात आली. याचा NSUI कार्यकर्त्यांनी विरोध केला असता त्यांना धक्काबुक्की करण्यात आली”, असा दावा महाराष्ट्र काँग्रेसने केला आहे.
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आशिर्वादाने ही गुंडगिरी सुरू असेल तर फडणवीसांनाही यांचे एक दिवस उत्तर द्यावे लागेल. महाराष्ट्रातले विद्यार्थी हे विसरणार नाहीत. फडणवीसांनी ABVP च्या गुंडांना नियंत्रित करावे अन्यथा जनताच यांना धडा शिकवेल. काँग्रेसने या देशातून इंग्रजांना पळवून लावलंय, तुमचे गुंड पळवून लावायला वेळ लागणार नाही”, असा इशाराही या पोस्टमधून देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here