पुणे (जिल्हा क्राइम रिपोर्टर सुहास गायकवाड) | पुणे शहरातील लष्कर पोलीस स्टेशनच्या हद्दीत विनापरवाना अग्निशस्त्र (पिस्टल) बाळगणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला लष्कर पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्याच्याकडून एक पिस्टल आणि एक जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ७ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास लष्कर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजानन चोरमले यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, लष्कर पोलीस स्टेशन हद्दीतील टीम लक लक हॉटेल समोरील स्टेव्हली रोड, बंगला नंबर ०९ शेजारी, कॅम्प, पुणे येथील सार्वजनिक रोडवर एक तरुण संशयास्पदरीत्या पिस्टल व जिवंत राऊंड घेऊन उभा आहे.
सदर मिळालेल्या माहितीची खात्री करून पोलीस उपआयुक्त (परिमंडळ-५), सहायक पोलीस आयुक्त (लष्कर विभाग) आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांना याबाबत कळविण्यात आले. त्यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक गजानन चोरमले, सहायक पोलीस निरीक्षक संजय माळी, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राहुल घाडगे व पथकाने तात्काळ नमूद ठिकाणी छापा टाकला.
पोलिसांनी संबंधित तरुणास शिताफीने ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे १ लाख रुपये किमतीचे एक देशी पिस्टल आणि एक जिवंत काडतूस सापडले. या प्रकरणी आरोपीविरुद्ध लष्कर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विश्वास उर्फ अण्णा राजू पवार (वय २७, रा. वाघोली, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याला ७ सप्टेंबर रोजी रात्री ११:५० वाजता औपचारिकरीत्या अटक करण्यात आली. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संजय माळी करत आहेत.
सदर धडक कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, सहायक पोलीस आयुक्त शुभदा संखे यांच्या मार्गदर्शनाखाली लष्कर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) गजानन चोरमले, सपोनि संजय माळी, पोउनि राहुल घाडगे, पोलीस कर्मचारी विजय कुंभार, निखिल जाधव, संदीप उकीरडे, अतुल मेंगे, लोकेश कदम आणि एटीसी पथकाचे पोह. धायगुडे यांच्या पथकाने पार पाडली.







