पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेची कारवाई; २४२ किलो तांब्याच्या तारांसह अर्टिगा कार हस्तगत, ४ गुन्हे उघडकीस
पुणे (जिल्हा क्राइम रिपोर्टर रोहन सोनाळे) | ग्रामीण भागातील शेतीपंपांसाठी बसवण्यात आलेल्या महावितरणच्या रोहित्रांमधील (डीपी) तांब्याच्या तारांची चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी तीन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून २४२ किलो वजनाच्या तांब्याच्या तारा आणि चोरीसाठी वापरलेली अर्टिगा कार असा एकूण १० लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे चाकण परिसरातील ४ गुन्हे उघडकीस आले आहेत.
मोहम्मद तय्यब मोहम्मद शफी शहा (वय २८), मैन्नुद्दीन खलील शहा (वय ३५, दोघे सध्या रा. कुदळवाडी, चिखली, पुणे; मूळ रा. जि. सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश) आणि सुफियान जमीरउल्ला खान (वय १९, रा. सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
देहूरोड फूड प्लाझाजवळ सापळा रचून कारवाईग्रामीण भागातील डीपींमधील तांब्याच्या तारा चोरीच्या वाढत्या घटना लक्षात घेऊन पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी गुन्हे शाखेला तपासाचे निर्देश दिले होते. मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक महेश खांडे व पोलीस हवालदार नितीन लोखंडे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, काही जण पांढऱ्या रंगाच्या अर्टिगा कारमधून चोरीच्या तांब्याच्या तारा विक्रीसाठी घेऊन जाणार आहेत. माहिती मिळताच पथकाने देहूरोड फूड प्लाझा येथे सापळा रचून संशयित अर्टिगा कार ताब्यात घेतली. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये २४२ किलो तांब्याच्या तारा आढळून आल्या.
पोलिसांनी वाहनासह सर्व मुद्देमाल जप्त करून तिघांना बेड्या ठोकल्या. चाकण परिसरातील ४ गुन्हे उघड; १०० टक्के मुद्देमाल हस्तगतआरोपींकडे केलेल्या सखोल चौकशीतून दक्षिण चाकण पोलीस ठाण्यातील १ आणि उत्तर चाकण पोलीस ठाण्यातील ३ असे एकूण ४ गुन्हे उघडकीस आले आहेत. या सर्व गुन्ह्यांमध्ये चोरीस गेलेला १०० टक्के मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. या टोळीकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहपोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) रोहिदास पवार व सहायक पोलीस आयुक्त सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग देवकाते, गोरक्षनाथ बालवडकर, रावसाहेब मोटे, श्रेणी पोउपनि महेश खांडे आणि अंमलदार सोमनाथ मोरे, नितीन उमरजकर, गणेश हिंगे, नितीन लोखंडे, प्रवीण कांबळे, विशाल गायकवाड, चंद्रकांत गडदे, गणेश कोकणे, पवन वाजे, विनोद वीर, हर्षद कदम, समीर रासकर, अमर कदम, मोहसीन अत्तार, अमोल गोरे, अशोक मरळ, गणेश सावंत व ज्ञानेश्वर कोळगे यांच्या पथकाने केली.







