श्री साईबाबा महाविद्यालयात ‘रासेयो’ स्थापना दिन उत्साहात; ताणतणाव व्यवस्थापनावर व्याख्यान
शिर्डी (विशेष प्रतिनिधी) : सोशल मीडियाचा अतिरेक टाळून त्याचा वापर ज्ञानवृद्धी, कौशल्यविकास आणि उत्पन्नाच्या नव्या संधी शोधण्यासाठी सकारात्मक पद्धतीने करावा. करिअर घडवताना शारीरिक व मानसिक आरोग्यालाही विद्यार्थ्यांनी तितकेच प्राधान्य दिले पाहिजे, असे प्रतिपादन ग्रीन फाउंडेशनचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष तथा राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष, युवा पत्रकार तुषार संजय महाजन यांनी केले.
श्री साईबाबा संस्थान संचलित येथील श्री साईबाबा महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (रासेयो) विभागाच्या वतीने स्थापना दिनानिमित्त ‘ताणतणाव व्यवस्थापन’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष औताडे होते. आपल्या मनोगतात तुषार महाजन म्हणाले, “आजच्या तरुणाईने केवळ मनोरंजनात वेळ वाया न घालवता डिजिटल माध्यमांचा उपयोग स्वतःच्या प्रगतीसाठी केला पाहिजे. नियमित व्यायाम, योगासने आणि ध्यानाला दैनंदिन जीवनात स्थान द्या. ‘Health is Wealth’ हे केवळ वचन न ठेवता आचरणात आणा.” याच महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असलेले महाजन यांनी यावेळी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत, “ज्या बाकांवर मी शिकलो, आज त्याच व्यासपीठावर अतिथी म्हणून उभे राहणे हा माझ्यासाठी अत्यंत भावनिक आणि अभिमानाचा क्षण आहे,” अशा भावना व्यक्त केल्या.
याप्रसंगी ‘मनोमय हीलिंग हार्ट फाउंडेशन’चे संस्थापक डॉ. पंकज येलम यांनी विद्यार्थ्यांना तणाव व्यवस्थापन, मानसिक स्वास्थ्य आणि सकारात्मक दृष्टिकोन याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. हे आयोजन श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.), उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे आणि शैक्षणिक संकुलाचे प्रशासकीय अधिकारी अतुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, प्रतिमापूजन तसेच विद्यापीठ व रासेयो गीताने झाली. प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. राजेंद्र काळे यांनी केले. सूत्रसंचालन कु. जुवेरिया पठाण व कु. स्नेहा धरम यांनी केले, तर सागर माहेश्वरी व शाहिद सय्यद यांनी चित्रीकरणाची जबाबदारी सांभाळली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. पंचफुला बोडके, प्रा. शिवनाथ तक्ते, प्रा. प्रभाकर गांडुळे यांच्यासह रासेयो स्वयंसेवक, प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.







