धुळे (उपसंपादक प्रशांत सूर्यवंशी): मराठा समाजाच्या उत्थानासाठी आणि विविध सामाजिक प्रश्नांवर सातत्याने निस्वार्थपणे कार्यरत असणारे कानसा वारणा फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकराव पाटील यांच्या समाजकार्याची दखल घेत धुळे जिल्हा न्यायालयात त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. रवींद्र पवार यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा पार पडला.
दीपकराव पाटील हे कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता मराठा समाजाच्या विविध हितावह प्रश्नांवर सतत आवाज उठवत आहेत. गरजू समाजबांधवांच्या अडीअडचणी सोडवणे, सामाजिक उपक्रमांचे आयोजन करणे आणि समाजाला संघटित ठेवण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात. त्यांच्या याच समाजोपयोगी कार्याचा गौरव करण्यासाठी ॲड. रवींद्र पवार यांनी त्यांना न्यायालयात निमंत्रित करून त्यांचा यथोचित सन्मान केला व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
दीपकराव पाटील भोपाळ दौऱ्यावर जात असताना, त्यांच्या प्रवासादरम्यान वेळेची उपलब्धता लक्षात घेऊन ॲड. पवार यांनी आग्रहाने बोलावून हा गौरव केला. “हा सन्मान केवळ एका व्यक्तीचा नसून समाजासाठी प्रामाणिकपणे झटणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या कार्याला मिळालेली पावती आणि प्रेरणा आहे,” अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
याप्रसंगी बोलताना ॲड. रवींद्र पवार यांनी, समाजातील वंचित आणि गरजू घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी सुरू असलेले हे कार्य भविष्यातही अखंड सुरू राहावे, अशी सदिच्छा व्यक्त केली. दीपकराव पाटील यांच्या या सन्मानाबद्दल विविध सामाजिक क्षेत्रांतून त्यांचे कौतुक होत आहे.







