सोलापूर (जिल्हा क्राइम रिपोर्टर राहुल मस्के) | सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहिमेअंतर्गत अक्कलकोट दक्षिण पोलिसांनी धडक कारवाई करत उसाच्या शेतात आंतरपीक म्हणून घेतलेली तब्बल १ कोटी ५ लाख ५५ हजार रुपये किमतीची गांजाची झाडे जप्त केली आहेत. मौजे आळगी (ता. अक्कलकोट) शिवारात केलेल्या या कारवाईत २११ किलोहून अधिक वजनाचा गांजा हस्तगत करण्यात आला असून, याप्रकरणी एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यात अंमली पदार्थांची तस्करी व विक्री रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी विशेष मोहीम तीव्र करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, अक्कलकोट दक्षिणचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे व त्यांचे पथक करजगी दूरक्षेत्र हद्दीत गस्तीवर असताना, आळगी शिवारातील एका शेतात उसाच्या पिकात गांजाची बेकायदेशीर लागवड केल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.
उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र टाकणे यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी तात्काळ आळगी येथील शेतात छापा टाकला. संशयित आरोपी मलप्पा गुरुबाळप्पा गड्डी उर्फ बिराजदार (वय ६०, रा. शेगाव, ता. अक्कलकोट) याच्या उसाच्या शेताची तपासणी केली असता, त्यात १२ फूट उंचीची गांजाची मोठी झाडे आढळून आली. पंचनाम्यादरम्यान पोलिसांनी २१० जिवंत आणि ३० वाळलेली अशी एकूण २४० झाडे जप्त केली. या झाडांचे वजन २११ किलो १०० ग्रॅम असून, त्याची बाजारभावाप्रमाणे किंमत सुमारे १ कोटी ५ लाख ५५ हजार रुपये इतकी आहे. या प्रकरणी संशयिताविरुद्ध अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये (NDPS Act) अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सपोनि प्रशांत बधे करत आहेत.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे व उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र टाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि विनोद घुगे, सपोनि प्रशांत बधे, पोसई राजशेखर निंबाळे यांच्यासह मोसलगी, चिंचोळकर, कोळी, धुमाळ, डोंगरीतोट, हडपद, धनगर, सुर्यवंशी, पाटील, बिराजदार, अन्सारी, शिंदे, पवार, माने आणि कोले आदी पोलीस अंमलदारांच्या पथकाने केली.







