अहिल्यानगर (जिल्हा क्राइम रिपोर्टर संजय शिंदे) । महागणपती मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीची 14 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे संस्थापक तथा चेअरमन विकास बेंगडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण व भव्य वातावरणात संपन्न झाली. सभासदांच्या आर्थिक प्रगतीसाठी विविध योजना, आधुनिक तंत्रज्ञान, व्यावसायिक प्रशिक्षण आणि रोजगारनिर्मितीच्या माध्यमातून संस्थेच्या कार्याचा विस्तार करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
सभेला संबोधित करताना विकास बेंगडे पाटील म्हणाले की, महागणपती संस्था आणि व्हीबीपी ग्रुपच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांत सभासदांच्या जीवनात आर्थिक समृद्धी आणण्यासाठी विविध उपक्रम व योजना राबविण्यात येत आहेत. गुंतवणूक करताना प्रत्येकाने दूरदृष्टी ठेवणे आवश्यक असून, आर्थिक परिस्थिती बदलण्यासाठी मानसिकतेतही बदल होणे गरजेचे आहे. कर्म, धर्म, मोक्ष आणि अर्थ या चारही बाबींना जीवनात महत्त्व आहे. केवळ पैसा नव्हे, तर ज्ञानही माणसाला मोठे करते, असे त्यांनी सांगितले.
जगातील आर्थिक व्यवस्थेत कामगार, व्यावसायिक, उद्योजक आणि गुंतवणूकदार असे विविध घटक असून, आर्थिक प्रगतीसाठी गुंतवणूक, योग्य नियोजन, मनुष्यबळ आणि सातत्य आवश्यक आहे. अपयशाची जबाबदारी दुसऱ्यावर ढकलण्यापेक्षा त्यातून शिकून पुढे जाणे गरजेचे आहे. संस्थेतील कर्मचाऱ्यांना सातत्याने प्रशिक्षण, कर्ज घेणाऱ्या सभासदांना योग्य मार्गदर्शन, अद्ययावत तंत्रज्ञान आणि व्यावसायिक प्रशिक्षण उपलब्ध करून दिल्यास संस्थेच्या ठेवींमध्येही वाढ होण्यास मदत होईल, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
देशातील अनेक उद्योजक लोकसहभाग आणि लोकांच्या आर्थिक ताकदीच्या माध्यमातून मोठे झाले आहेत. त्यामुळे आर्थिक व्यवस्था वाढविण्यासोबतच ती टिकविणेही महत्त्वाचे आहे. पारंपरिक पद्धतीने काम करण्याऐवजी नवनवीन संधी आणि मार्गांचा अवलंब करून महागणपती परिवार पुढे जात असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी विकास बेंगडे पाटील यांनी एनबीपी लॉजिस्टिक कंपनीच्या स्थापनेची घोषणा केली. या माध्यमातून सुमारे 1200 कोटी रुपयांची आर्थिक स्वायत्तता निर्माण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेचे कामकाज केवळ ठेवी स्वीकारणे, त्यांची सुरक्षितता राखणे आणि त्यावर व्याज देणे , एवढ्यापुरती मर्यादित न राहता, घरातील बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत त्यांच्या कुटुंबांना आर्थिक ताकद देण्याचे काम करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
‘ जिथे नियोजन असते, तिथे यश निश्चित असते ’, या भूमिकेतून संस्थेचे काम सुरू असून महागणपतीचे व्हिजन हे व्यापक आर्थिक विकास आणि बाजारपेठेतील संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी समाधान सन्नके यांनी संस्थेचा वार्षिक अहवाल सादर केला. ठेवी, नफा, गुंतवणूक, ऑडिट वर्ग, कर्ज योजना, ठेव योजना तसेच विविध उपक्रमांची आकडेवारी त्यांनी अत्यंत प्रभावी पद्धतीने मांडली. संस्थेत कार्यरत असलेल्या 205 कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीची माहिती देतानाच संस्थेच्या प्रगतीतील त्यांच्या योगदानाचा आढावा घेतला. अहवालातील विविध विषयांना सभासदांनी टाळ्यांच्या कडकडाटात मंजुरी दिली.
संस्थेने विविध ठिकाणी केलेल्या गुंतवणुकीमुळे अहवाल वर्षात संस्थेला 7 कोटी 78 लाख रुपयांचा नफा झाला असून, संस्थेच्या आर्थिक प्रगतीत दिवसेंदिवस वाढ होत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
सभेला सह संस्थापिका व संचालिका निलम बेंगडे पाटील, संचालक विठ्ठल बेंगडे पाटील, संचालक उद्धव एरंडे, संचालक राजेंद्र देवके, संचालक गोविंद इंदोरे, तज्ञ संचालक अनिल गावडे, तज्ञ संचालक जालिंदर इंदोरे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षा साधना बोत्रे, प्रसिद्ध उद्योजक बाळासाहेब बोत्रे, रत्नागिरी जिल्हा परिषद सदस्य किशोर देसाई, संस्थेचे सल्लागार अनंतकुमार मलिक, ऑडिटर ऋषभ तिवारी, नेशन मीडिया संचालक रोहित गुप्ता, व्ही बी ग्रुप व डेला ग्रुप चे समन्वयक अजित आंबिरकर, संजय चव्हाण, प्रेमप्रकाश हंडा, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या नगर जिल्हा निवड समितीचे जिल्हाध्यक्ष सुरेश खोसे पाटील यांच्यासह 32 शाखांचे 5 हजारांहून अधिक सभासद, हितचिंतक, वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्हीबीपी ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर देशमुख यांनी अत्यंत सूत्रबद्ध पद्धतीने केले.







