सातारा (उपसंपादक अरुण मोरे) : मोटारसायकलवरून जाणाऱ्या एका नोकरदाराचे नॅनो कारमधून अपहरण करून, चाकूचा धाक दाखवत ५० लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सातारा जिल्हा व सत्र न्यायालयाने ५ आरोपींना ७ वर्षे साधा कारावास आणि प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. प्रथम अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एम. शेटे यांनी हा निकाल दिला. तसेच, दंडाच्या रकमेतून २५ हजार रुपये फिर्यादीला नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
संजीवनी विष्णु जगताप (वय २९, रा. जगतापवाडी, सातारा; मूळ रा. बामणी, ता. खानापूर, जि. सांगली), शिवाजी श्रीरंग धनावडे (वय ४०, रा. देगावफाटा, सातारा; मूळ रा. मामर्डी, ता. जावळी), निलेश महादेव भोसले (वय २६, रा. साईबाबा मंदिरासमोर, सातारा), निखिल ऊर्फ चिक्या दिलीप रणदिवे (वय २९, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, सातारा) आणि रणजित जगन्नाथ घाडगे (वय २३, रा. काळेवाडी, ता. माण, जि. सातारा) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. काय होती घटना?ही घटना ९ जून २०१४ रोजी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास घडली होती. फिर्यादी हे आपल्या मोटारसायकलवरून जात असताना आरोपींनी त्यांना अडवून जबरदस्तीने पांढऱ्या रंगाच्या नॅनो गाडीत बसवले आणि त्यांची मोटारसायकलही ताब्यात घेतली. त्यानंतर फिर्यादीला एसपीएस कॉलेजजवळील एका शेतात नेण्यात आले. तेथे एका महिलेने फिर्यादीकडे थेट ५० लाख रुपयांची मागणी करत, पैसे न दिल्यास कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी दिली.
फिर्यादीने आपण नोकरदार असल्याचे सांगत इतकी मोठी रक्कम देण्यास असमर्थता दर्शवली. त्यानंतर आरोपींनी ५ लाख आणि अखेर चाकूचा धाक दाखवून २ लाख रुपयांची मागणी केली. शेवटी फिर्यादीने घरात जेवढे पैसे असतील ते देण्याचे कबूल केल्यावर आरोपी त्यांना त्यांच्या घरी घेऊन गेले. तेथे फिर्यादीकडून ६० हजार रुपये रोख आणि अॅक्सिस बँकेचे ४० हजार व ४५ हजार रुपयांचे दोन धनादेश (चेक) जबरदस्तीने उकळले. तसेच पोलिसांत तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर. ए. मुठाणे यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. खटल्यादरम्यान सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील श्रीमती मंजुषा तळवलकर आणि तत्कालीन अतिरिक्त जिल्हा सरकारी अभियोक्ता श्रीमती सुरेखा क्षीरसागर यांनी बाजू मांडली. सुनावणीदरम्यान एकूण १० साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी वकिलांचा युक्तिवाद, परिस्थितीजन्य पुरावे आणि उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे ग्राह्य धरत न्यायाधीश ए. एम. शेटे यांनी आरोपींना दोषी ठरवले. त्यानुसार भादंवि कलम ३४१ अन्वये १ महिना साधा कारावास, कलम ३६३ अन्वये ५ वर्षे कारावास व ५ हजार रुपये दंड, कलम ३९७ अन्वये ७ वर्षे कारावास व ५ हजार रुपये दंड आणि कलम ४५२ अन्वये ५ वर्षे कारावास व ५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली.
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील व सातारा शहरचे वपोनि सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पैरवी अधिकारी म्हणून पो.कॉ. कुमार जाधव, पो.कॉ. अमित भरते आणि तत्कालीन पो.कॉ. अजित फरांदे यांनी न्यायालयीन कामकाजात सहकार्य केले.







