ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सहाय्यक आणि शिपाई एसीबीच्या जाळ्यात

लाचलुचपत
file photo

ठाणे (सहसंपादक लक्ष्मीनारायण वन्नम) । सरकारी पोर्टलवर ‘आपले सरकार’ सेवा केंद्राचा पत्ता अपडेट करून देण्याच्या मोबदल्यात ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सहाय्यक आणि शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले. शुक्रवारी सायंकाळी जांभळी नाका परिसरात ही धडक कारवाई करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी गणेश बालकृष्ण मोरे (वय ५२, महसूल सहाय्यक) आणि खालिद गुलाब शेख (वय ५३, शिपाई) यांना अटक केली आहे.

तक्रारदाराच्या पत्नीचे ‘आपले सरकार’ सेवा केंद्र २०१७ पासून मिरा रोड (पूर्व) येथील सोना रिव्हेट इमारतीमध्ये सुरू होते. मात्र इमारत जीर्ण झाल्यामुळे हे केंद्र मिरा रोड येथीलच राबिया टॉवरमधील दुकान क्रमांक ७ येथे स्थलांतरित करण्यात आले. या नवीन जागेचा पत्ता सरकारी पोर्टलवर अद्ययावत (अपडेट) करण्यासाठी तक्रारदाराने २३ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू व नोंदणी शाखेत रीतसर अर्ज केला होता.
सदर अर्जावर पुढील कार्यवाही करून नवीन केंद्राची नोंद सक्रिय करण्यासाठी महसूल सहाय्यक गणेश मोरे आणि शिपाई खालिद शेख यांनी तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) धाव घेऊन तक्रार नोंदवली.
एसीबीच्या पथकाने १० सप्टेंबर रोजी पंचांच्या उपस्थितीत पडताळणी केली असता, दोन्ही आरोपींनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी एसीबीने जांभळी नाका परिसरात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताच पथकाने दोघांनाही झडप घालून ताब्यात घेतले. आरोपींच्या हातावर लाचेच्या रकमेला लावण्यात आलेली अँथ्रासीन पावडर आढळून आली आहे. दोन्ही आरोपींवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here