जळगाव (जिल्हा क्राइम रिपोर्टर शरद चव्हाण) | डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन तसेच ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे यांच्या ७५ व्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष शिक्षक आघाडीच्या वतीने जिल्ह्यातील ४५ आदर्श शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. १३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात हा सोहळा उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार एकनाथराव खडसे यांचा अमृतमहोत्सवानिमित्त शिक्षक आघाडीच्या वतीने मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार : एकनाथराव खडसे
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना आमदार खडसे म्हणाले, “शिक्षक हा समाजातील अत्यंत महत्त्वाचा घटक असून तो नवी पिढी घडवण्याचे मोलाचे कार्य करतो. मात्र, राज्य सरकार शिक्षकांकडून अशैक्षणिक कामे करवून घेत आहे. त्यातच नव्याने रुजू झालेल्यांपासून ते वीस वर्षांपासून कार्यरत शिक्षकांवरही ‘टीईटी’सारखी परीक्षा लादणे अत्यंत चुकीचे आहे. या मुद्द्यावर आगामी विधानपरिषद अधिवेशनात सरकारला जाब विचारू आणि शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी खंबीरपणे उभे राहू.” शेवटी त्यांनी सर्व पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा ॲड. सौ. रोहिणीताई खडसे-खेवलकर, प्रदेश सरचिटणीस एजाजभाई मलिक, जिल्हा निरीक्षक भास्करराव काळे, वाय. एस. महाजन सर आणि मनपा प्रशासनाधिकारी खलील शेख यांनी मनोगत व्यक्त केले.
या सोहळ्यास महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी, जिल्हा समन्वयक विकास पवार, महानगर कार्याध्यक्ष डॉ. संग्रामसिंह सूर्यवंशी, राजू मोरे, किरण राजपूत, सुनील माळी, विनायक पाटील, मजहर पठाण, रमेश बारे, रईस खाटीक, गौरव वाणी, गिरीश सांगळे, सुरेश पगारे, सुमनताई बनसोडे, माधुरी पाटील, शिक्षक आघाडीचे कार्याध्यक्ष पंकज सूर्यवंशी, सरचिटणीस जिया बागवान, सहसरचिटणीस विजय विसपुते, अविनाश सरदार, महेश तायडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष मनोज भालेराव यांनी केले. सूत्रसंचालन प्रवीण धनगर यांनी तर आभार प्रदर्शन मुस्ताक भिस्ती यांनी केले.







