मुंबई (संपादक सुनिल पाटील) | पोलीस प्रशासन आणि नागरिक यांच्यातील समन्वय अधिक दृढ करण्यासाठी तसेच सामाजिक सलोखा वाढीस लागावा या उद्देशाने बोरिवली पोलीस ठाण्यात नुकतीच एका विशेष समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत पोलीस निरीक्षक तथा जनसंपर्क अधिकारी (PRO) गजानन खंडेराव जोगदंड यांनी उपस्थितांशी संवाद साधत कायदा-सुव्यवस्था राखण्यात नागरिकांचे सहकार्य आणि जनसंवादाचे महत्त्व अधोरेखित केले.
या महत्त्वपूर्ण बैठकीस महाराष्ट्र विधान भवनाचे सहसचिव राजेश तडवी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. शासकीय प्रशासन व पोलीस यंत्रणा यांच्यातील सुयोग्य ताळमेळामुळे सर्वसामान्यांचे प्रश्न कसे तत्परतेने सोडवता येतात, यावर त्यांनी यावेळी विशेष मार्गदर्शन केले. तसेच प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद हुसेन काळसेकर यांनी बैठकीत सक्रिय सहभाग घेत तळागाळातील नागरिकांच्या समस्या मांडल्या आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून पोलिसांना सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
याप्रसंगी प्रसिद्ध उद्योजक, परवेझ बनारसवाला यांनीही उपस्थित राहून आधुनिक डिजिटल माध्यमे व समाजमाध्यमांच्या साहाय्याने पोलिसांचे जनजागृतीपर उपक्रम सर्वसामान्यांपर्यंत कसे प्रभावीपणे पोहोचवता येतील, याबाबत महत्त्वपूर्ण विचार मांडले. बोरिवली परिसरातील शांतता, सुव्यवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अशा प्रकारचा थेट संवाद निरंतर सुरू ठेवण्याचा निर्धार सर्व मान्यवरांनी यावेळी व्यक्त केला.







