मुंबई (क्राइम रिपोर्टर गणेश तळेकर) | महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजने’साठी अर्ज करण्यास १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. कला व साहित्य क्षेत्रातील ज्या मान्यवर कलावंतांनी अद्याप सन २०२६-२७ या वर्षासाठी अर्ज केलेले नाहीत, त्यांना या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या निर्णयानुसार, एप्रिल २०२४ पासून पात्र साहित्यिक व कलावंतांना दरमहा ५ हजार रुपये मानधन दिले जात आहे. प्रत्येक जिल्ह्यातून जिल्हा निवड समितीमार्फत दरवर्षी १०० कलावंतांची या योजनेसाठी निवड केली जाते. ही योजना १९५४-५५ पासून संपूर्ण राज्यात राबविली जात असून, गरजू आणि होतकरू कलाकारांना याचा मोठा आधार मिळाला आहे.
योजनेसाठी पात्रता निकष पुढीलप्रमाणे आहेत. अर्जदाराचे वय ५० वर्षांपेक्षा जास्त असावे. दिव्यांगांसाठी वयोमर्यादा १० वर्षांनी शिथिल असून, ती ४० वर्षे आहे. कला व साहित्य क्षेत्रात किमान १५ वर्षांचे सातत्यपूर्ण व दर्जेदार योगदान आवश्यक. कुटुंबाचे सर्व मार्गांनी मिळणारे वार्षिक उत्पन्न ६० हजार रुपयांपेक्षा कमी असावे. वयाने ज्येष्ठ, विधवा, परितक्त्या आणि दिव्यांग कलाकारांना प्राधान्य दिले जाईल. महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे बंधनकारक आहे. तसेच, केंद्र किंवा राज्य शासनाच्या इतर कोणत्याही नियमित मासिक पेन्शन योजनेचा लाभ घेणाऱ्यांना ही योजना लागू नाही.
पात्र लाभार्थ्यांना https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करताना आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला (तहसीलदार), रहिवासी दाखला, वयाचा पुरावा, बँक पासबुकची प्रत (आयएफएससी कोडसह), इतर शासकीय योजनेचा लाभ घेत नसल्याचे प्रतिज्ञापत्र, आणि लागू असल्यास अपंगत्व, विधवा किंवा परितक्त्या असल्याचा दाखला जोडणे अनिवार्य आहे. अर्ज करताना आपला मोबाईल क्रमांक आधार कार्ड आणि बँक खात्याशी लिंक (सीडिंग) असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी कलावंतांनी आपल्या नजीकच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील सांस्कृतिक विभागाशी संपर्क साधावा.







