चोपड्यात बेकायदेशीर गॅस रिफिलिंगचा अड्डा उद्ध्वस्त; १.३६ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकावर गुन्हा दाखल

गॅस रिफिलींग
File Photo

जळगाव (जिल्हा क्राइम रिपोर्टर प्रमोद रुले) | जिल्ह्यातील चोपडा शहरातील लोहाना पेट्रोल पंपाच्या पाठीमागील एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर घरगुती गॅस रिफिलिंगच्या अड्ड्यावर शहर पोलिसांनी धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी १ लाख ३६ हजार ५०० रुपये किमतीचे साहित्य व सिलिंडर जप्त केले असून एका आरोपीला ताब्यात घेतले आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास लोहाना पेट्रोल पंपामागील पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीररीत्या गॅस भरण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कोणत्याही परवान्याशिवाय घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमधून वाहनांमध्ये धोकादायक रीतीने गॅस रिफिलिंग केला जात असल्याचे धाडीदरम्यान स्पष्ट झाले.
यावेळी गॅस रिफिलिंग मशीन: मोटर व नळ्या जोडलेली २ यंत्रे (किंमत रु. ४०,०००/-), इलेक्ट्रॉनिक काटे: वजन करण्यासाठीचे २ इलेक्ट्रॉनिक काटे (किंमत रु. २०,०००/-), गॅस सिलिंडर: एचपी व इंडियन कंपनीचे ५ भरलेले आणि १२ रिकामे घरगुती गॅस सिलिंडर (किंमत रु. ७६,५००/-) असा एकूण १,३६,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी पोलीस अंमलदार पंकज रमाकांत ठाकूर (वय ३५, नेमणूक चोपडा शहर पो.स्टे.) यांच्या फिर्यादीवरून आरोपी प्रमोद विजय महाजन (वय ३६, रा. अरुण नगर, चोपडा) याच्याविरुद्ध चोपडा शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३२८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २८७, २८८ आणि अत्यावश्यक वस्तू कायदा (EC Act) कलम ३, ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही धडक कारवाई पोलीस निरीक्षक पवन देसले व पोलीस उपनिरीक्षक युवराज वाळुंज यांच्या पथकाने केली असून, गुन्ह्याची नोंद पोलीस अंमलदार शुभांगी लांडगे यांनी केली आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक पवन देसले करत आहेत.गॅस रिफिलिंग

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here