वाढत्या व्यसनाधीनतेमुळे सामाजिक शांतता धोक्यात; बेकायदेशीर धंदे तातडीने बंद करण्याची मागणी
दिग्रस/कांदळी (प्रतिनिधी): कांदळी गावात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या अवैध दारू विक्रीमुळे गावातील कायदा, सुव्यवस्था व सामाजिक शांतता धोक्यात आली आहे. दारूच्या आहारी गेल्याने अनेक तरुण मार्गभ्रष्ट होत असून अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि गावात पूर्णतः ‘दारू बंदी’ करण्यासाठी कांदळी गावातील सुशिक्षित व जागरूक तरुणांनी एकत्र येत पोलीस पाटलांना निवेदन दिले.
गावात ठिकठिकाणी छुप्या मार्गाने चालणाऱ्या अवैध दारू विक्रीमुळे भांडण-तंटे आणि गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थ आणि विशेषतः तरुण वर्गात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या समस्येचे समूळ उच्चाटन व्हावे, या उद्देशाने प्रवीण जाधव, विकास राठोड, लखन राठोड, लखन पवार आणि लखन चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील तरुणांच्या शिष्टमंडळाने पोलीस पाटलांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
निवेदनात गावात छुप्या मार्गाने होणारी अवैध दारू विक्री त्वरित व पूर्णपणे बंद करण्यात यावी. बेकायदेशीर दारू विक्रेते व अवैध धंदे चालवणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जावी. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने गावात नियमित गस्त वाढवावी. ‘व्यसनमुक्त कांदळी’ संकल्पना राबवण्यासाठी ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाने संयुक्त मोहीम हाती घ्यावी आदी प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.
निवेदन स्वीकारताना पोलीस पाटलांनी तरुणांच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. “तरुणांनी उठवलेला आवाज अत्यंत रास्त असून, हे निवेदन तात्काळ संबंधित पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवले जाईल. गावात अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल,” असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी कांदळी गावातील प्रमुख तरुण, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तरुणांच्या या आक्रमक व पुढाकार घेणाऱ्या भूमिकेमुळे गावात दारू बंदीच्या मोहिमेला मोठे बळ मिळाले आहे.







