मुंबई (जेष्ठ पत्रकार सुरेश पटनाईक) | आगामी श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोविंदा पथकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मुंबई महानगरपालिका रुग्णालयांमध्ये विशेष वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी भारतीय जनता युवा मोर्चा, मुंबईच्या वतीने करण्यात आली. यासंदर्भात भाजयुमो मुंबईचे अध्यक्ष श्री. दीपक सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली आज मुंबईच्या मा. महापौर श्रीमती रितू तावडे जी यांना निवेदन देण्यात आले.
दहीहंडी हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा आणि साहसी क्रीडा संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. या उत्सवात मोठ्या संख्येने गोविंदा सहभागी होत असतात. उंच मानवी मनोरे रचताना दुखापत होण्याची शक्यता लक्षात घेता, जखमी गोविंदांना तातडीने आणि योग्य वैद्यकीय उपचार मिळणे अत्यंत आवश्यक आहे.
त्यामुळे दि. ४ व ५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये गोविंदांसाठी विशेष वॉर्ड व स्वतंत्र बेड राखीव ठेवावेत, आवश्यक वैद्यकीय पथक तैनात करावे, औषधोपचार तसेच आपत्कालीन वैद्यकीय सुविधा सज्ज ठेवाव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
दहीहंडी उत्सव उत्साहात आणि जल्लोषात साजरा होत असतानाच प्रत्येक गोविंदाच्या आरोग्य व सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य मिळावे, यासाठी मुंबई महानगरपालिकेने आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी, अशी अपेक्षा भाजयुमो मुंबईच्या वतीने व्यक्त करण्यात आली.







