पैशाचा पाऊस’ पाडण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणारी टोळी जेरबंद : ९२ लाखांच्या बनावट नोटा जप्त

पैशाचा पाऊस

अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; बारामतीचे ३ आरोपी अटकेत, १ कोटींहून अधिकचा मुद्देमाल हस्तगत

अहिल्यानगर (जिल्हा क्राइम रिपोर्टर संजय शिंदे):‘पैशाचा पाऊस’ पाडण्याचे आमिष दाखवून नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी बारामती (जि. पुणे) येथील तीन आरोपींना अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून ५०० रुपये दराच्या तब्बल ९२ लाख ९ हजार ५०० रुपये किमतीच्या बनावट नोटा, कार व मोबाईल असा एकूण १ कोटी ३ लाख ७४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गणेश दिलीप शेवाळे (वय ३३, रा. अशोकनगर, बारामती), सुमित विकास चंदनशिवे (वय २५, रा. तांदुळवाडी, बारामती) आणि सुरज वसंत कांबळे (वय २७, रा. गारगडवाडी, बारामती, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडगाव रोडवरील विनायक कॉलनी येथे गणेश शेवाळे हा भाड्याने राहत असून, त्याच्याकडे मोठ्या प्रमाणावर बनावट नोटा असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने पंचांसमक्ष शेवाळे याच्या घरावर छापा टाकला. घराची झडती घेतली असता जिन्याखालील एका पिशवीत ५०० रुपयांच्या १८ हजार ४१९ बनावट नोटा (किंमत ९२ लाख ९ हजार ५०० रुपये) तसेच नोटा बनवण्यासाठी लागणारे कोऱ्या कागदांचे बंडल मिळून आले. पोलिसांनी घरातून तिघांना ताब्यात घेऊन बनावट नोटांसह ५ मोबाईल आणि व्हॉक्सवॅगन कार (एमएच-१४-डीएफ-०३६५) जप्त केली.
अंधश्रद्धेतून नागरिकांची फसवणूक; मालेगावातून आणल्या नोटाआरोपींकडे केलेल्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. आरोपी गणेश शेवाळे याने या बनावट नोटा त्याचे साथीदार प्रताप धुमाळ (रा. बोल्हेगाव, अहिल्यानगर) व अशोक भिमराज दारकुंडे (रा. गजानन कॉलनी, एमआयडीसी, अहिल्यानगर) यांच्या मदतीने फॉर्च्यूनर गाडीतून मालेगाव (जि. नाशिक) येथील ‘अम्मु’ नावाच्या इसमाकडून अवघ्या २५ हजार रुपयांत आणल्याची कबुली दिली. आरोपी नागरिकांना ‘पैशाचा पाऊस’ पाडण्याचा दावा करत त्यांच्यात अंधश्रद्धा निर्माण करायचे आणि त्यांचा विश्वास संपादन करून मूळ रकमा उकळून बनावट नोटांच्या जोरावर गंडा घालत असत.
या प्रकरणी प्रताप धुमाळ, अशोक दारकुंडे व मालेगावचा अम्मु हे तिघे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या प्रकरणी आरोपींविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम १७९, १८०, ३१८(४), ३(५) सह महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोलीस उपनिरीक्षक संदीप दरवडे, अंमलदार विजय ठोंबरे, गणेश लोंढे, शाहीद शेख, संदीप पवार, विष्णु भागवत, सुयोग सुपेकर, संतोष खैरे, बाळासाहेब गुंजाळ, फुरकान शेख, प्रशांत राठोड व भाग्यश्री भिटे यांच्या पथकाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here