लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

bribe-to-police
file photo

लोणावला (प्रतिनिधी) | लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक नाथा रामकिसन केकाण (वय ३८) याला २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडून अटक केली आहे. सोमवार, दि. १६ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास लोणावळा येथील मॅप्रो गार्डन परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे.

 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या भावाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९ (ii), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक नाथा केकाण यांच्याकडे होता. या गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी तसेच गुन्ह्याची कलमे कमी करण्यासाठी आरोपी पोलीस उपनिरीक्षकाने वेळोवेळी १ लाख ३० हजार रुपये स्वीकारल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर दिनांक १४ नोव्हेंबर २०२६ रोजी संबंधित गुन्ह्याचे दोषारोपपत्र (चार्जशीट) लवकर न्यायालयात पाठविण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक नाथा केकाण यांनी तक्रारदाराकडे आणखी ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तडजोड होऊन २० हजार रुपये देण्याचे ठरले.

तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांच्याकडे तक्रार दिल्यानंतर विभागाच्या पथकाने तक्रारीची पडताळणी करून सोमवार, दि. १६ नोव्हेंबर रोजी लोणावळा येथील मॅप्रो गार्डन परिसरात सापळा रचला. सायंकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास पंचांसमक्ष २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षक नाथा केकाण यांना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. त्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.

अटक करण्यात आलेले आरोपी पोलीस उपनिरीक्षक नाथा रामकिसन केकाण (वय ३८) हे लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन, मावळ येथे कार्यरत आहेत. ते फ्लॅट क्रमांक ४०१, साई व्हिजन सोसायटी, भोंडवेबाग, रावेत, पुणे येथे राहण्यास आहेत. ते वर्ग-२ अधिकारी असल्याची माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here