नांदेड (प्रतिनिधी) : लग्नाचा तगादा लावूनही नकार दिल्याच्या रागातून, वयाने दहा वर्षे लहान असलेल्या प्रियकराने ४५ वर्षीय प्रेयसीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील पाटोदा येथे घडली आहे. मंगल कोंडीबा धुमाळे (वय ४५) असे मृत महिलेचे नाव असून, घटनेनंतर आरोपी प्रियकर कृष्णा जाधव (वय ३५) हा फरार झाला आहे. याप्रकरणी किनवट पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाटोदा येथील रहिवासी असलेल्या मंगल धुमाळे या अविवाहित होत्या आणि गावात एकट्याच राहत होत्या. त्यांचे गावातीलच कृष्णा जाधव (वय ३५) या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. कृष्णा हा नेहमी मंगल यांच्या घरी येत असे. गेल्या काही दिवसांपासून कृष्णा हा मंगल यांच्यामागे लग्नासाठी तगादा लावत होता. मात्र, मंगल यांनी लग्नास नकार दिल्याने दोघांमध्ये वारंवार खटके उडत होते.
शनिवारी रात्री कृष्णा मंगल यांच्या घरी गेला असता दोघांमध्ये पुन्हा याच कारणावरून कडाक्याचे भांडण झाले. संतापाच्या भरात कृष्णाने मंगल यांचा गळा आवळून हत्या केली आणि घटनास्थळावरून पळ काढला. दुसऱ्या दिवशी सकाळी मंगल यांची आई घरी आली असता, मुलगी निपचित अवस्थेत पडलेली पाहून त्यांना धक्काच बसला.
माहिती मिळताच किनवट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. घरात आरोपीची चप्पल आढळून आल्याने पोलिसांचा संशय बळावला. तसेच, घटनेनंतर कृष्णाला घरातून पळून जाताना मृत महिलेच्या बहिणीने पाहिले असल्याची माहितीही समोर आली आहे.
लग्नास नकार दिल्याने कृष्णाने बहिणीला मारहाण करून तिचा खून केला, अशी तक्रार मयत मंगल यांचा भाऊ दत्ता कोंडीबा धुमाळे यांनी किनवट पोलिसांत दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी कृष्णा जाधव याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून, फरार आरोपीचा कसून शोध सुरू केला आहे.







