पुणे ( जिल्हा संपादक सुहास गायकवाड) | मोक्का (MCOCA) सारख्या गंभीर गुन्ह्यात मागील सहा महिन्यांपासून फरार असलेला कुख्यात निलेश घायवळ टोळीतील पाहिजे असलेला आरोपी पुणे शहर गुन्हे शाखा युनिट-३ च्या जाळ्यात अडकला आहे. पोलिसांनी सापळा रचून मांजरी येथून या आरोपीला शिताफीने अटक केली आहे.
आलंकार पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गु.र.नं. १४६/२०२६ नुसार, भारतीय न्याय संहिछेतील (BNS) विविध कलमांसह आर्म कायदा, महाराष्ट्र पोलीस कायदा आणि मोक्का (कलम ३(१)(ii), ३(४)) अंतर्गत गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपी निखिल सुभाष ठोंबे (वय १९, रा. दारूवाला पुलाजवळ, नाना पेठ, पुणे) हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. त्याचा शोध घेण्यासाठी वरिष्ठांनी विशेष सूचना दिल्या होत्या.
गुन्हे शाखा युनिट-३ चे पोलीस अंमलदार आशिष राठोड यांना आरोपीबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. तसेच पोलीस हवालदार अतुल साठे यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी हा मांजरी बुद्रुक, पुणे येथे लपून बसल्याची खात्री केली.
या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक मांजरी येथील श्री बालाजी अपार्टमेंट परिसरात रवाना झाले. पोलिसांनी इमारतीला चारही बाजूंनी वेढा घालून पळून जाण्याची कोणतीही संधी न देता दिनांक २९ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास आरोपी निखिल सुभाष ठोंबे याला ताब्यात घेतले. पुढील कायदेशीर कारवाईसाठी व तपासासाठी त्यास कोथरूड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त यांच्या पथकाच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदर धडक कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्रीमती तेजस्विनी सातपुते, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) गौहर हसन, आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-१) शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-३ चे पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, महिला पोलीस अंमलदार अर्चना वाघमारे, पोलीस हवालदार अतुल साठे, किशोर शिंदे, विपुल गायकवाड, कैलास लिम्हण, आशिष राठोड आणि पुरुषोत्तम गुन्ला यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली आहे.







