नाना पाटेकर यांची साधी व संवेदनशील माणूसकी; ३३ वर्षांपूर्वीच्या एका चाहत्याचा अनुभव चर्चेत

नाना पाटेकर

मुंबई (संपादक सुनिल पाटील) | प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर त्यांच्या दमदार अभिनयशैलीसोबतच त्यांच्या साधेपणासाठी आणि सामाजिक जाणिवांसाठी ओळखले जातात. त्यांच्या याच दिलदार व्यक्तिमत्त्वाचा आणि एका चाहत्याप्रती त्यांनी दाखवलेल्या आपुलकीचा एक हृदयस्पर्शी किस्सा समोर आला आहे. बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती, मुंबईचे प्रभारी प्रमुख कार्यवाह योगेश शुक्ल यांनी हा जुना अनुभव शेअर केला आहे.

दिनांक २ व ३ डिसेंबर १९९२ रोजी जळगावच्या जे.डी.सी.सी. बँकेच्या सभागृहात नाना पाटेकर यांच्या गाजलेल्या ‘पुरुष’ या नाटकाचा प्रयोग होता. योगेश शुक्ल यांना हे नाटक पाहण्याची तीव्र इच्छा होती, परंतु कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत असल्याने, त्यावेळी तिकिटासाठी लागणारे पैसे त्यांच्या खिशात नव्हते.

त्यादरम्यान, रामनिवास लॉजमध्ये मुक्कामाला असलेल्या नाना पाटेकर यांच्याशी त्यांनी संपर्क साधला आणि नाटक पाहण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, नाटकाचा प्रयोग आधीच ‘हाउसफुल’ झाल्याने प्रेक्षागृहातील खुर्चीवर बसून नाटक पाहणे अशक्य होते. ही अडचण जेव्हा नानांपर्यंत पोहोचली, तेव्हा त्यांनी क्षणाचाही विलंब न करता आयोजकांना बोलावून “याची रंगपीठात बसण्याची व्यवस्था करा,” अशा सूचना दिल्या.

या आठवणीला उजाळा देताना योगेश शुक्ल यांनी म्हटले आहे की, “ही केवळ नाटक पाहण्याची संधी नव्हती, तर ती एका मोठ्या कलाकाराने सामान्य चाहत्याला दिलेली आपुलकीची वागणूक होती.” नाना पाटेकरांच्या या साधेपणाची आणि चाहत्यांविषयीच्या आदरयुक्त भूमिकेची ही आठवण नाना पाटेकर यांच्या दुःखद निधनानंतर प्रतिक्रिया देतांना शेअर केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here