जळगाव (संपादक सुनिल पाटील) । आर. आर. विद्यालयात शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक गिरीश रमणलाल भावसार यांच्या अध्यक्षतेखाली पालक शिक्षक संघाची सभा संपन्न झाली. या सभेत 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी पालकांमधून उपाध्यक्ष, शिक्षकांमधून सचिव, सहसचिव व पालकांमधून एक सहसचिव तसेच कार्यकारिणी मंडळाचे सदस्य यांची नियुक्ती करण्यात आली.
सदर सभेत वर्षभर चालणारे विद्यार्थी पूरक उपक्रम, शैक्षणिक घडामोडी, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित करण्यात येणार असलेले कार्यक्रम त्याचप्रमाणे विविध स्पर्धा तसेच पालकांचाही चांगल्या प्रकारे सहभाग कसा घेता यावा अशा विविध मुद्द्यांवर चर्चा संपन्न झाली. पालकांनी शैक्षणिक उपक्रमांचे कौतुक करत शिक्षकांना धन्यवाद दिले पण त्यासोबतच अस्वच्छ शौचालय,पाण्याची कमतरता असे मुद्दे सुद्धा मांडले त्यावर सविस्तर चर्चा झाली.
श्री अरुण सपकाळे सर यांनी नुकतेच प्रभारी मुख्याध्यापक झालेले गिरीश भावसार यांची यांचे अभिनंदन करत पालक शिक्षक संघाच्या नियमावलीनुसार शाळेचे मुख्याध्यापक हे पदसिद्ध अध्यक्ष असतात असा ठराव पारित केला. सभेत ज्येष्ठ शिक्षक टी. बी. पांढरे, सर उपाध्यक्ष जयवंत सोनवणे सहसचिव सौ दिपाली सोनार यांनीही मनोगत व्यक्त केले.पालक शिक्षक संघाचे सचिव रामचंद्र पाटील यांनी प्रास्ताविक केले व नवनियुक्त सहसचिव सौ लीना तायडे यांनी आभार मानले.







