जळगाव (संपादक सुनिल पाटील) | आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांकडून व्यक्त केलेला संभाव्य दुष्काळाचा धोका आणि शहरात आधीच सुरू असलेला दोन दिवसांआड पाणीपुरवठा लक्षात घेता, वाघूर धरणातील पाणी इतरत्र कुठेही न वळवता केवळ जळगाव शहरासाठीच राखीव ठेवावे, अशी ठाम भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार पक्ष) तर्फे घेण्यात आली आहे. आगामी ९ तारखेच्या महासभेत वाघूरचे पाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व क्रीडा संकुलाकडे पाईपलाईनद्वारे वळवण्याच्या प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शवत पक्षाच्या शिष्टमंडळाने महानगरपालिका आयुक्तांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
शहराचा वाढता विस्तार आणि नागरिकांना २४ तास पाणी देण्याचे दिलेले आश्वासन विचारात घेता हा निर्णय जळगावकरांवर अन्याय करणारा असल्याचे पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी यांनी स्पष्ट केले. वैद्यकीय महाविद्यालय व क्रीडा संकुल यांसारख्या कोट्यवधी रुपयांच्या प्रकल्पांची आखणी करतानाच पाण्याच्या स्त्रोतांचे नियोजन करणे आवश्यक होते. मात्र, प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर आता शहराच्या हक्काचे पाणी पळवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
याशिवाय, पाणी उपलब्ध नसताना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची भव्य इमारत नेमकी कशी उभी राहिली आणि तिथे बांधकामाचे ‘क्युरिंग’ (पाणी मारणे) कसे केले गेले, याबाबत गंभीर संशय उपस्थित करण्यात आला. बांधकामाच्या दर्जाबाबत साशंकता असल्याने या इमारतीचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. भविष्यात नागरिकांकडून ‘पाणीचोर’ हा ठपका लागू नये, यासाठी सर्वपक्षीय नगरसेवकांनी जळगावकरांच्या हिताचा विचार करून या प्रस्तावाला महासभेत विरोध करावा, असे आवाहनही पदाधिकाऱ्यांनी केले आहे. दरम्यान, आयुक्त महोदयांनी या सर्व मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा करून योग्य तो विचार करण्याचे आश्वासन दिले आहे.
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार पक्ष) महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी, कार्याध्यक्ष संग्रामसिंह सूर्यवंशी, राजू मोरे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा मंगलाताई पाटील, अल्पसंख्याक आघाडी जिल्हाध्यक्ष मजहरभाई पठाण, जिल्हा कार्यालय सरचिटणीस सुनील माळी, जिल्हा उपाध्यक्ष किरण राजपूत, महानगर युवक जिल्हाध्यक्ष विनायक पाटील, महानगर चिटणीस नईम खाटिक, जिल्हा उपाध्यक्ष गणेश पाटील, ओबीसी सेलचे माजी जिल्हाध्यक्ष नामदेव वाघ, युवक जिल्हा उपाध्यक्ष गणेश हटकर, कार्यालय मंत्री सतीश चव्हाण यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.







