पोलीस बॉईज असोसिएशनच्या पाठपुराव्याला यश; राज्य राखीव पोलीस दलात (SRPF) महिलांची स्वतंत्र बटालियन स्थापन होणार

पोलीस बॉईज

कोल्हापूर (महाराष्ट्र राज्य क्राइम रिपोर्टर सतिश चव्हाण) | केंद्र सरकारच्या धर्तीवर (CRPF, CISF, BSF, ITBP) विविध सुरक्षा दलांमध्ये महिलांची भरती असून स्वतंत्र महिला बटालियन कार्यरत आहेत, तसेच इतर राज्यांमध्येही पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर महिलांची भरती केली जाते. मात्र, महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दलात (SRPF) महिलांची भरती होत नसल्याने पात्र तरुणींना संधी मिळत नव्हती. हीच खंत लक्षात घेऊन ‘पोलीस बॉईज असोसिएशन’तर्फे सन २०२२ पासून एसआरपीएफमध्ये महिलांची भरती करून स्वतंत्र बटालियन स्थापन करण्यात यावी, अशी जोरदार मागणी लावून धरण्यात आली होती. अखेर या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, महाराष्ट्रात लवकरच एसआरपीएफमध्ये महिलांची स्वतंत्र बटालियन स्थापन होणार आहे.

 

पोलीस बॉईज असोसिएशनच्या या महत्त्वपूर्ण मागणीवर महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री योगेश रामदास कदम यांनी मुंबई येथील पोलीस महासंचालक कार्यालयात एक उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीस राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते, अतिरिक्त पोलीस महासंचालक निखिल गुप्ता, अतिरिक्त पोलीस महासंचालक कृष्ण प्रकाश तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक निधीश मिश्रा आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत एसआरपीएफमध्ये महिलांची स्वतंत्र बटालियन स्थापन करण्याबाबत अत्यंत यशस्वी आणि सकारात्मक चर्चा करण्यात आली.

या ऐतिहासिक निर्णयामुळे राज्यातील हजारो महिला व तरुणींना पोलीस भरतीप्रमाणेच आता राज्य राखीव पोलीस दलातही थेट नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. विशेषतः, एसआरपीएफ कुटुंबातील अनुकंपा तत्त्वावरील महिला आणि मुलींना आता सफाई कामगार किंवा मदतनीस म्हणून काम करण्याची वेळ येणार नाही; तर त्यांना वडिलांच्या किंवा पतीच्या जागी थेट ‘जवान’ म्हणून पोलीस दलात सेवा बजावण्याची संधी मिळणार आहे.

या महत्त्वपूर्ण घडामोडीमुळे राज्यातील महिला वर्गात व तरुणींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून, एसआरपीएफ कुटुंबातील अनुकंपाधारक महिलांनी आणि मुलींनी पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद तानाजी वाघमारे यांचे विशेष आभार मानले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here