सोलापूर (जिल्हा क्राइम रिपोर्टर राहुल मस्के) | जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि नागरिकांच्या आरोग्याला व सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या अवैध हातभट्टी व्यवसायावर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक अतुल वि. कुलकर्णी यांनी दिले होते. या आदेशाची अंमलबजावणी करत स्थानिक गुन्हे शाखा आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्तपणे मुळेगाव तांडा येथे मोठी कारवाई केली आहे.
दक्षिण सोलापूर हद्दीतील मुळेगाव तांडा येथे अवैध हातभट्टीचा व्यवसाय सुरू असल्याची गोपनिय माहिती मिळाल्यानंतर, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या नेतृत्वाखालील पथक, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि भरारी पथकाने संयुक्तपणे दि. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी या ठिकाणी धाड टाकली.
कारवाईदरम्यान घटनास्थळी अवैध हातभट्टी निर्मितीसाठी वापरण्यात येणारा कच्चा माल, चुल, लोखंडी बॅरल, प्लास्टिक बॅरलमध्ये भरलेला गुळ-मिश्रित रसायन आणि हातभट्टी तयार करण्यासाठी आवश्यक असलेले इतर साहित्य असा एकूण अंदाजे ५ लाख ४१ हजार ३०० रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला.
विशेष बाब म्हणजे, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून अवैध हातभट्टी निर्मितीचे ठिकाण पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यासाठी चक्क J.C.B. मशीनच्या सहाय्याने हातभट्टीचे अड्डे आणि संपूर्ण साहित्य जागीच नष्ट करण्यात आले. अवैध हातभट्टी तयार करण्याच्या उद्देशाने साहित्य बाळगल्याप्रकरणी ०४ सराईत हातभट्टी व्यवसायिकांवर सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून, राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फतही स्वतंत्र कारवाई सुरू आहे.
अवैध हातभट्टी व्यवसाय, बनावट दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यांविरुद्ध भविष्यातही अशीच कठोर कारवाई सुरू राहणार असून, कुणालाही पाठिशी घातले जाणार नाही. तसेच गुन्हेगारांविरुद्ध तडक हद्दपार आणि M.P.D.A. सारख्या प्रभावी प्रतिबंधक कारवाया केल्या जातील, असा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक अतुल वि. कुलकर्णी आणि अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि भरारी पथकाच्या अधिकारी व अंमलदारांनी ही संयुक्त व धडाकेबाज कामगिरी पार पाडली.







