जळगाव (संपादक सुनिल पाटील) | पितृपक्ष सुरू झाला की सर्वसामान्यांच्या मनात एकच प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे — “ज्या जागी पिंडदानाचा घास ठेवलाय, तिथे कावळे का येत नाहीत? आणि आपल्या गावातून किंवा शहरातून खरोखरच कावळे गायब झाले आहेत का?” या सर्वसाधारण प्रश्नांमागे पूर्वजांचा कोप किंवा अंधश्रद्धा नसून पूर्णपणे वैज्ञानिक आणि पर्यावरणीय कारणे दडलेली आहेत, अशी स्पष्ट माहिती प्रसिद्ध पक्षीमित्र राजेंद्र गाडगीळ यांनी दिली आहे.
या विषयावर सविस्तर प्रकाश टाकताना त्यांनी आजकाल शहरांमधल्या गल्लीबोळात पडलेला कचरा, हॉटेल्सबाहेर उघड्यावर टाकलेले अन्न आणि गटारांमुळे कावळ्यांना दिवसभर सहजपणे हवे तसे अन्न-पाणी मिळते, त्यामुळे ते केवळ पिंडदानाच्या अन्नावर अवलंबून राहत नाहीत. तसेच, पिंडदानाच्या वेळी जमलेली गर्दी आणि लोकांची सततची हालचाल पाहून कावळे अत्यंत सावध होतात व खाली उतरायला धाजत नाहीत. तसेच कावळ्यांना साध्या भातापेक्षा किंवा अतिगोड अन्नापेक्षा कीटक, मऊ अन्न आणि मांसाहारी तुकडे जास्त आवडतात. शिवाय, पिंडदानाच्या ठिकाणी भात किंवा धान्य ठेवले की तिथ आधीच मैना आणि कबुटरांची फौज गर्दी करते, ज्यामुळे कावळे आपोआप दूर राहणे पसंत करतात. शहरांमध्ये कावळे कमी होण्याचे निरीक्षण चुकीचे नसून, बदलती जीवनशैली यासाठी कारणीभूत आहे. कावळ्यांना घरटे बांधण्यासाठी वड, पिंपळ, चिंच, आंबा अशा जुन्या व पसरट झाडांची गरज असते, जी काँक्रीटीकरणामुळे आता गायब झाली आहेत. घरोघरी फिरणाऱ्या कचरागाड्यांमुळे उघड्यावर आयते अन्न मिळणे बंद झाल्याने कावळ्यांची उपासमार वाढली आहे. याशिवाय, विजेच्या उघड्या तारांमुळे व हाय-व्होल्टेज केबल्समुळे शॉक लागून होणारे मृत्यू, कबुटरांनी उजळलेली जागा, घारींकडून होणारी अंडी व पिल्लांची शिकार आणि प्लास्टिकयुक्त अन्न किंवा विषारी उंदीर खाल्ल्याने होणारे ‘सेकंडरी पॉयझनिंग’ यामुळे कावळ्यांच्या अस्तित्वावर मोठा धोका निर्माण झाला आहे.
त्यामुळे एका बाजूला कावळ्यांची संख्या सातत्याने घटत चालली आहे, तर दुसऱ्या बाजूला सहज उपलब्ध होणारे अन्न आणि माणसांची गर्दी यामुळे पिंडदानासाठी कावळे वेळेवर येत नाहीत, असे शास्त्रीय कारण पक्षीमित्र राजेंद्र गाडगीळ यांनी स्पष्ट केले आहे.







