नाशिक (उपसंपादक इंजि कुबेर जाधव) | मूळचे भऊर येथील रहिवासी व सध्या देवळा तालुक्यातील लोहोणेर मंडळात मंडळ अधिकारी म्हणून कार्यरत असलेले मनोज गांगुर्डे (मनु तात्या) यांना महाराष्ट्र शासनामर्फे नुकतीच नायब तहसीलदारपदी पदोन्नती जाहीर झाली आहे. त्यांनी महसूल विभागात दिलेल्या प्रदीर्घ व उल्लेखनीय सेवेची दखल घेत ही पदोन्नती देण्यात आली आहे. या आनंदाप्रीत्यर्थ भऊर व विठेवाडी परिसरातील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला.
महसूल विभागात तलाठी म्हणून शासकीय सेवेत रुजू झालेल्या गांगुर्डे यांनी कळवण आणि देवळा तालुक्यात दीर्घकाळ आपली सेवा बजावली आहे. पदोन्नतीनंतर ते मूळ देवळा तहसील कार्यालयातच नायब तहसीलदार म्हणून कार्यरत राहणार असल्याचे समजते. त्यामुळे स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या असून परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
दिनांक ११ ऑक्टोबर रोजी भऊर येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन भऊर व परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीने मनोज गांगुर्डे व त्यांच्या धर्मपत्नी (गांगुर्डे दांपत्य) यांचा शाल, श्रीफळ व फेटा बांधून सपत्नीक भावुक सत्कार करण्यात आला, तसेच त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
या सत्कार सोहळ्याप्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य समन्वयक कुबेर बापू जाधव, डॉ. जे. डी. पवार, विविध कार्यकारी सोसायटी (भऊर) चे चेअरमन दीपक पवार, उषा फर्टीलायझरचे संचालक दीपक पवार, मिलिंद पवार, वसंतदादा सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन फुला आप्पा जाधव, कवी आबा आहेर, अक्षय पवार, सनी गुंजाळ आणि नयन पवार यांच्यासह परिसरातील नागरिक व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.







